
बंदुकीच्या बळावर अफगाणिस्तावर कब्जा मिळविणाऱया तालिबानविरुद्ध महिलांनी आवाज उठविला आहे. तालिबानच्या दहशतीला न घाबरता महिलांनी काबूल, हैरातमध्ये जोरदार आंदोलन केले. तालिबानविरुद्ध पोस्टर्स, फलक झळकावीत राष्ट्रपती निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली. दरम्यान, पंजशीरवर ताबा मिळविल्याचा दावा करीत तालिबानी दहशतवाद्यांनी रक्तरंजित हिंसाचार केला. बेछूट गोळीबारात 17 जण ठार आणि 40 जण जखमी झाले आहेत.
1996 ते 2001 या काळात तालिबानी राजवटीत महिलांवर जाचक अटी, बंधने घालून अत्याचार करण्यात आले. आता पुन्हा तालिबानने कब्जा मिळविल्यामुळे अफगाणी महिलांविषयी जगभरात चिंता व्यक्त होत आहे. मात्र, काबूल, हेरातमध्ये तालिबानला महिलांनी ‘आवाज’ दिला. बुरखा झुगारून हिजाब परिधान करून शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. ‘आम्ही तुम्हाला घाबरत नाही’ तुमच्या सरकारमध्ये महिलांचे काय स्थान आहे? असे सवाल करीत महिलांनी पोस्टर्स झळकाविले, घोषणाबाजी केली. यावेळी तालिबान्यांनी महिलांवर अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या. दरम्यान, महिलांच्या आंदोलनाची जगभरातील मीडियाने दखल घेतली आहे.
हिंदुस्थानात मशिदीत दुआ मागणाऱया लोकांवर गोळीबार केला जात नाही, बॉम्बहल्ले होत नाहीत. हिंदुस्थानात मुलींना शाळेत जाण्यापासून रोखले जात नाही. महिलांचे डोके, पाय कापले जात नाहीत. त्यामुळे तालिबानने हिंदुस्थानातील मुस्लिमांची चिंता करू नये.
मुख्तार अब्बास नकवी, हिंदुस्थानचे केंद्रीयमंत्री
पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा आणि उन्माद
अफगाणिस्तानवर कब्जा मिळविला असला तरी पंजशीर आलेला नाही. माजी उपराष्ट्रपती अमरूल्ला सालेह आणि पंजशीरचा नेता अहमद मसूद यांच्या नॉर्दन अलायन्स फौजांचा तालिबानला कडवा विरोध आहे. त्यातच शुक्रवारी रात्री उशिरा घुसून पंजशीरमध्ये ताबा मिळविल्याचा दावा तालिबानने केला. याचा आनंद साजरा करताना तालिबानी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यात लहान मुलांसह 17 जण ठार झाले. 40 जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अमरूल्ला सालेह हे पंजशीर सोडून पळून गेल्याचे वृत्त होते. सालेह यांनीच टोलो न्यूजशी बोलताना मी पंजशीरमध्येच आहे. तालिबानने ताबा मिळविल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले. दरम्यान, पंजशीरमध्ये घनघोर लढाई सुरू आहे.

























































