महिलांचं काम फक्त मुलांना जन्म देणे, त्या कधीही मंत्री होऊ शकत नाहीत – तालिबान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानात तालिबानी शासनाच्या स्थापनेनंतर सरकारमध्ये महिलांच्या सहभागाबाबत निदर्शने सुरू झाली आहेत. स्थानिक माध्यमांनी तालिबानच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने असा दावा केला आहे की, महिलांना तालिबानी सरकारमध्ये मंत्री बनवले जाणार नाही. महिलांचं काम फक्त मुलांना जन्म देणे, इतकेच आहे, असे तालिबानी प्रवक्त्याने म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजने तालिबानच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ट्विट करत म्हटले आहे की, ‘एक महिला मंत्री होऊ शकत नाही. हे असे आहे जसे तुम्ही तिच्या गळ्यात काहीतरी असे टाकत आहात, जे ती सांभाळू शकत नाही. मंत्रिमंडळात एका महिलेचा सहभाग असणे आवश्यक नाही. त्यांनी फक्त मुलं जन्माला घालायला हवीत. महिला आंदोलक संपूर्ण अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करत नाहीत.’

दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबानी शासन आल्यापासून सामान्य लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून काबूलसह इतर अनेक शहरांमध्ये तालिबान सरकारच्या विरोधात निदर्शने होत आहेत. विशेष म्हणजे आंदोलनाचे नेतृत्व महिला करत आहेत.