जय श्रीराम शुगर साखर कारखान्यासमोर ‘हलगी बजाओ’ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर साखर कारखान्याकडून (2017-18) मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल थकवल्याने संतप्त शेतकर्‍यांनी मंगळवारी दुपारी साखर कारखान्यासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन केले. शेतकर्‍यांचा आवाज कारखानदारापर्यंत पोहचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी दिला. हळगाव येथील जय श्रीराम साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एन. निभें यांनी आंदोलकांना थकीत पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हलगी बजाओ आंदोलन पाच तासांनी मागे घेण्यात आले.

थकीत पैसे मिळण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकर्‍यांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हलगी बजाव आंदोलन केले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, संतोष पवार, युवक तालुका अध्यक्ष अॅड. ऋषिकेश डुचे, हनुमान उगले यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 31 जुलै 2018 पर्यंत ऊसाचे बिल देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही शेतकर्‍यांना पेमेंट मिळाले नाही. जर ऊसाचे पेमेंट कारखान्याने दिले नाही तर शेतकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा संतोष पवार यांनी दिला. जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे म्हणाले की, जामखेडसारख्या दुष्काळी भागात हळगाव येथील साखरकारखाना चालला पाहिजे हा आमचा हेतू आहे. कारखाना टिकला तर शेतकरी टिकेल. मात्र, ऊसाचे पेमेंट हे शेतकर्‍यांच्या हक्काचे आहे ते त्यांना मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.

जय श्रीराम साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक निभें यांनी दूरध्वनीवरून शेतकऱ्यांना थकीत पेमेंट देण्याचे आश्वासन दिले. गेल्या वर्षी कारखाना सुरू करताना आम्ही करमाळा तालुक्यातील ऊस आणला त्यावेळी आम्ही ऊस उत्पादकाला 2030 रूपये प्रतिटन भाव दिला. उतारा कमी आल्याने आम्ही शासनाच्या नियमानुसार 1825 रुपये भाव दिला. आम्ही एफआरपी प्रमाणे भाव दिला आहे. तरी आमच्याकडे पैसे आल्यावर आम्ही पैसे देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.