यवतमाळमध्ये शाळा दत्तक योजनेसाठी भिक्षा द्या आंदोलन; अनोख्या आंदोलनाची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

नुकताच शासनाने एक अध्यादेश काढला आहे. यात राज्यातील जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या शाळा दत्तक देण्याचे घोषित केले आहे. जो व्यक्ती संबंधित शाळा दत्तक घेईल, त्याने सुचविलेले नाव त्या शाळेला दिले जाईल. यासाठी शासनाने निर्धारित केलेले लाखो रुपयांचे शुल्क मात्र त्या व्यक्तीला भरावे लागणार आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचे शुल्क गोळा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या या धोरणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील एक सुजाण नागरिक मात्र चांगलेच संतापले आहेत.

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील विजय ढाले या शेतकऱ्यांने सरकारच्या शाळा दत्तक योजनेला विरोध केला आहे. माझी शाळा श्रीमंतांना विकू नका हवं तर सरकारने माझ्या दोन्ही किडण्या घ्या, मात्र शाळा विकू नका, असे म्हटले होते. आता त्यांनी या गोरगरिबांच्या शाळा वाचवण्यासाठी भूमिका घेतली आहे. आता त्यांनी रस्त्यावर भिक्षा मागून दान मागितले आहे आणि शाळा वाचवण्यासाठी त्यांची धडपड त्यांनी सुरू केलेली आहे. काही दिवसांपूर्वी विजय ढाले यांनी आर्णीचे तहसीलदार यांना निवेदन देऊन शाळा दत्तक योजने संदर्भात थेट शासनावर गुन्हे नोंदविण्याची मागणी केली होती. सोमवारी त्यांनी भीक मागून शाळा वाचविण्यासाठी अनोखे आंदोलन केले. यामुळे त्यांच्या या आंदोलनाची चर्चा होत आहे.