मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये तीन तरूण झाडावर चढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

राज्यातील बहुचर्चीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा व समाजाला घटनेच्या चौकटीत बसणारे व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज मंगळवार (दि.२७) रोजी सकाळी सात वाजल्यापासून तीन मराठा सेवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढले. बराच वेळ ते तिघेही झाडावर चढून मराठा आरक्षणाची मागणी करत होते. अखेर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देवून आरक्षणाचा प्रश्न शासन दरबारी तातडीने कळविण्याची मागणी केली. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना तातडीने फॅक्स पाठवून आंदोलकांच्या मागण्या बाबत कळवले. त्यानंतर तीनही तरूण झाडावरून खाली उतरले.

किशोर गिराम, अविनाश पवार, संदिप कदम अशी झाडावर चढून मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या तरूणांचे नाव आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे, मराठा आरक्षणाला विलंब होत असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले आहे. आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे राज्यातील जवळपास ४२ तरूणांनी आपले आत्मबलिदान दिले आहे. हजारो युवकांवर मराठा आरक्षणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षण देण्याबाबतचा अहवाल तात्काळ विधीमंडळात पटलावर ठेवून मराठा समाजाला त्वरीत घटनेच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण द्यावे. या मागणीसाठी आज तीन तरूणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडावर चढून मराठा आरक्षणाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल घेवून मराठा आरक्षण लवकर देण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांना आंदोलनाची माहिती देवून मराठा आरक्षण देण्यासंदर्भात ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी अशोक हिंगे, बी.बी.जाधव, गणेश उगले, विनोद इंगोले, अशोक सुकवसे, मळीराम यादव, पंडित तुपे आदिंनी केली. दरम्यान हे निवेदन प्राप्त होताच अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी तातडीने राज्याच्या प्रधान सचिवांना फॅक्सद्वारे निवेदन पाठवून आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना तातडीने फॅक्स पाठवून आंदोलकांच्या मागण्याबाबत कळवले. त्यानंतर तीनही तरूण झाडावरून खाली उतरले.