
सामना प्रतिनिधी । लातूर
जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाचा निषेध करीत मुख्यमंर्त्यांंची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून उलटी हालगी वाजवण्यात आली तर मराठा समाजातील आमदारांचा निषेध करीत त्यांना मृत घोषीत करण्यात आले.
राज्यात लोकशाही मार्गाने ५८ मोर्चे काढण्यात आले. शासनाने केवळ दिशाभूल करण्याचे काम केले. त्याचा निषेध करीत लातुरात धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे प्रतिकात्मक प्रेत तयार करुन एका कार्यकर्त्यांने मुंडणही करुन घेतले. यावेळी मराठा समाजाच्या १४५ आमदारांनाच मृत घोषीत करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कोपर्डी येथील भगीनीच्या मारेकऱ्यांना त्वरीत फाशी द्यावी, आरक्षणासाठी केंद्राकडे शिफारस करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झालेले होते.



























































