
हिंगोली जिह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गद्दार आमदार संतोष बांगरचा बाजार उठला! येथे 17 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. नांदेडातही गद्दार खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांचा टांगा पलटी झाला. बाजारगप्पा झोडणाऱया गद्दारांना नांदेड बाजार समितीत एकही जागा जिंकता आली नाही. 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीला देत मतदारांनी गद्दारांचे पार्सल खोकेबंद केले! परभणी, बीड, जालना लातुरातही महाविकास आघाडीचाच बोलबाला राहिला.
हिंगोलीतील जवळा बाजार या मोठय़ा बाजार समितीवरही महाविकास आघाडीने 18 पैकी 16 जागा जिंकल्या. येथेही भाजप-मिंध्यांचा सुपडा साफ झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार समितीच्या 18 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. महाविकास आघाडीने 16 जागांवर दणदणीत विजय मिळविला. भाजप व मिंधे गटाच्या सर्वपक्षीय पॅनलला केवळ 2 जागांवर यश मिळवता आले. लातूर जिह्यात जळकोट, अहमदपूरला महाविकास आघाडीचा विजय झाला, तर देवणी बाजार समिती भाजपच्या ताब्यात गेली.
नेवासा बाजार समितीवर शिवसेनेचा भगवा; विखेंनी मुरकुटे, लंघेंना ताकद देऊनही भाजप सफाचट
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी आमदार मुरकुटे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना मोठी ताकद देऊनही भाजपच्या उमेदवाराचा सुफडा साफ झाला. आमदार शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने सर्व 18 जागांवर मोठय़ा मताधिक्याने विजय मिळवला. भाजपला धोबीपछाड देत आमदार गडाख यांनी एकहाती सत्ता मिळवली. बाजार समितीची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम होती. त्यात मुरकुटे व लंघे यांना मतदारांनी साफ नाकारले असून, आमदार गडाख यांच्यावर विश्वास ठेवल्याचे दिसून आले. मागील निवडणुकीपेक्षा या वेळेस गडाख गटाचे मताधिक्य वाढले आहे.
























































