Air India Plane Crash – अहमदाबादजवळ भयंकर विमान अपघात, एअर इंडियाचे ‘ड्रिमलायनर’ कोसळले; 290 ठार

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे ‘बोईंग 787 ड्रीमलायनर’ विमान अवघ्या 32 सेकंदात रहिवासी भागात कोसळले आणि भयंकर स्फोट होऊन विमानाची राखरांगोळी झाली. गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळापासून 2 कि.मी अंतरावर असलेल्या मेघनानी नगर परिसरात ही भीषण विमान दुर्घटना घडली. यात विमानातील 241 प्रवाशांसह 290 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानातील रमेश विश्वास कुमार हा एकमेव प्रवासी बचावला. मृतांमध्ये दोन नवजात बालके, 11 लहान मुले तसेच 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटीश, 1 कॅनेडियन, 7 पोर्तुगीज नागरिकांचा समावेश आहे. जिथे हे विमान कोसळले ते बी. जे. मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचे वसतिगृह व लगतचा परिसरही बेचिराख झाला. त्यात डॉक्टर आणि रहिवाशी अशा किमान 49 जणांवर काळाचा घाला पडला. विमानाच्या भयंकर स्फोटामुळे उसळलेल्या काळ्याकुट्ट धुराचे लोट अक्षरशŠ आभाळापर्यंत झेपावले होते. हिंदुस्थानच्या इतिहासातील ही अत्यंत भीषण विमान दुर्घटना असून अवघा देश सुन्न झाला आहे.

दुर्घटनाग्रस्त ‘बोइंग 787 ड्रीमलायनर’ विमान गुरुवारी दुपारी 1 वाजून 47 मिनिटांनी अहमदाबाद विमानतळाहून हवेत झेपावले होते. दुर्दैवाने पुढच्या तीस सेपंदातच विमान कोसळले. विमानाने उशिरानेच उड्डाण घेतले होते. तसेच दुर्घटना घडण्याआधी वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्ष व इतर सुरक्षा यंत्रणांना संभाव्य धोक्याचा संदेशही पाठवला होता. मात्र त्या संदेशाच्या आधारे खबरदारी घेण्याआधीच होत्याचे नव्हते झाले. विमान मेघानी नगर परिसरातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांच्या निवासी वसाहतीवर कोसळले. त्यात विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याने आतील 241 प्रवाशी आणि स्थानिक नागरिक मिळून 290 हून अधिक जणांचा दुर्दैवी अंत झाला, असे वृत्त रॉयटर्सने दिले. विमानाच्या स्पह्टामुळे अनेक रहिवाशी इमारतींचे प्रचंड नुकसान होऊन कित्येक स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या गाडय़ा, रुग्णवाहिका तसेच इतर सुरक्षा यंत्रणांच्या गाडय़ांनी तातडीने दुर्घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले. अवघ्या दोन ते तीन मिनिटांत पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणा बचावकार्यासाठी पोहोचल्या होत्या. विमानाच्या भीषण स्पह्टामुळे आतील प्रवाशांना वाचवता आले नाही. मात्र जखमी स्थानिक नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत हलवण्यात आले. तसेच आणखी जीवितहानी टाळण्यासाठी मेघनी नगर परिसर जवळपास 70 ते 80 टक्के रिकामा करण्यात आला. सर्व यंत्रणांचे रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. स्पह्टामुळे भडका उडालेल्या आगीत होरपळलेल्या लोकांना शहरातील रस्त्यांवर ‘ग्रीन कॉरीडॉर’ करून रुग्णालयांपर्यंत नेण्यात आले. दरम्यान, विमानातील एकही प्रवाशी वाचला नसून विमान रहिवाशी भागात कोसळल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.

अपघाताचे कारण अस्पष्ट, डीजीसीएकडून चौकशी सुरु

पायलटची चूक, तांत्रिक बिघाड, इंजिन फेल की पक्षी धडकून दुर्घटना घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान दुर्घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे. दुर्घटनाग्रस्त ’बोईंग 787 ड्रीमलायनर’ विमानाची नोंदणी व्हीटी-एएनबी’ म्हणून झाली होती, असे डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. दुर्घटनेनंतर डीजीसीएने 24 तास सक्रीय राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या माध्यमातून बचाव कार्य तसेच प्रवाशांच्या कुटुंबीयांशी समन्वय साधण्यात आला. डीजीसीएच्या चौकशीतून दुर्घटनेमागील नेमके कारण समोर येणार आहे.

हिंदुस्थानला कोणतीही मदत करायला तयार -ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात भीषण दुर्घटना असा उल्लेख करत तीव्र शोक व्यक्त केला. या संकटाच्या समयी हिंदुस्थानला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास ती आम्ही तत्काळ देऊ, असे त्यांनी नमूद केले. दुर्घटनाग्रस्त विमान पाहिल्यास स्फोट झाला असे वाटत नाही. इंजिन बिघडल्याने विमान कोसळले असेल, असा तर्कही ट्रम्प यांनी काढला.

मोदी आज घटनास्थळी जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच रुग्णालयात जखमींची चौकशी केली. त्यानंतर उच्चस्तरीय बैठकही घेतली. मृतांची अंतिम यादी डीएनए टेस्टनंतर जारी करण्यात येईल, असे शहा यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱयांशी पह्नवरून चर्चा केली. ते उद्या सकाळी दिल्लीतून अहमदाबादला पोहचतील व घटनास्थळाला भेट देतील.

देव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी हि म्हण आज प्रत्यक्षात तंतोतंत खरी ठरली. अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भिषण अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी फक्त एक प्रवासी जिवंत अवस्थेत बचाव पथकाला आढळला. रमेश विश्वकुमार असे त्या प्रवाशाचे नाव असून तो 11ए या सीटवर बसला होता रमेशला अपघातात बरीच दुखापत झाली असून येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी दिली.

एअर इंडियाचे चेअरमन चंद्रशेखरन यांची भावनिक पोस्ट

एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला झालेल्या भीषण दुर्घटनेने एअर इंडियाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून भावनिक पोस्ट केली. पोस्टमधून त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. ‘‘मी अत्यंत दुःखाने या वृत्ताला दुजोरा देतो की अहमदाबादहून लंडन गेटविक येथे जाणारे एअर इंडिया 171 विमान दुर्दैवी अपघातात कोसळले आहे. या अत्यंत हादरवून टाकणाऱया घटनेतील पीडितांचे कुटुंबीय आणि प्रियजन यांच्याप्रती आम्ही संवेदना आणि शोक व्यक्त करतो,’’ असे ट्विट चंद्रशेखरन यांनी केले.

गुडबाय इंडिया

आयुष्यात पुढच्या क्षणाला काय होईल याचे भाकित सांगणे तसे कठिणच असाच काहीसा मनाला वेदना देणारा प्रसंग एअर इंडियाच्या विमान अपघातात घडला दोन परदेशी नागरिक हिंदुस्थानातून आपल्या मायदेशी जाणार असल्याने प्रचंड उत्सूक आणि आनंदी होते. गुडबाय इंडिया… पुन्हा घरी जात आहोत आनंदाने, आनंदाने, आनंदाने असे म्हणत त्या दोघांनी रिल तयार केली आणि विमान गाठले मात्र पुढच्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले या अपघातानंतर त्यांची शेवटची रिल मात्र सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाली.

विमानाचा मागील भाग इमारतीवर अडकला

विमान जमिनीवर कोसळण्याआधी त्याचा मागील भाग निवासी डॉक्टरांच्या वसतिगृह इमारतीवर अडकला होता. विमान अत्यंत जोराने इमारतीवर आदळले. त्यात इमारतीलाही आग लागल्याने तेथे राहणारे अनेक लोक जखमी झाले आहेत. घटनेनंतर या परिसरात एकच हाहाकार उडाला. विमान कोसळले तेव्हा निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात 50 ते 60 इंटर्न डॉक्टर होते. विमानाचा शक्तिशाली स्पह्ट होऊन काळय़ाकुट्ट धुराचे मोठे लोट आकाशात पोहोचले होते. आसपासच्या सर्वच लोकांना विमानाच्या स्पह्टाने हादरवले, असे एका प्रत्यक्षदर्शीने अपघाताचे भयानक दृश्य वर्णन करताना सांगितले. दुर्घटनेआधीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्याआधारे चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मृतांमध्ये 8 मराठी 4 क्रू मेंबर्स, 4 प्रवाशी

विमान दुर्घटनेत नागपूर येथील एकाच कुटुंबातील चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर चार मराठी क्रू मेंबरचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या विमानात 2 पायलटांसह 10 क्रू मेंबर डय़ुटीवर होते. मृत पावलेल्या महाराष्ट्रीयन प्रवाशांमध्ये महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि रोशिनी सोंघरे यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींना दु:ख… नि:शब्द झालोय!

अहमदाबादमधील दुर्घटनेने धक्का बसला आहे, दुःख झाले आहे. ही एक हृदयद्रावक घटना आहे. मी निःशब्द झालोय. या घटनेबाबत मला शब्दांत भावना व्यक्त करता येत नाहीत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

ब्रिटिश पंतप्रधान केअरस्टार्मर  म्हणाले, धक्कादायक!

ब्रिटनचे पंतप्रधान केअल स्टार्मर यांनीही दुर्घटनेतील मृतांप्रती शोक व्यक्त केला. ही धक्कादायक घटना आहे. अपघाताची दृश्ये अतिशय भयानक आहेत. या दुःखद प्रसंगी माझ्या भावना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत, असे त्यांनी नमूद केले.