नगर – ऑडिओ क्लिप प्रकरणात 7 पोलीस निलंबित, क्लिप व्हायरल करणाऱ्यावर कारवाई नाई?

जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या पोलीस दलातील ऑडिओ क्लिपप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सात पोलीस कर्मचाऱयांना निलंबित केले आहे. दरम्यान, ही क्लिप व्हायरल करणाऱयावर काय कारवाई झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱयांवर कर्तव्यात कसूर, पोलीस खात्याला अशोभनीय वर्तणूक, तसेच इतर ठपका ठेवण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक एच. एस. सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी भरत मोरे, गणेश डहाळे, राजाराम शेंडगे, अजित घुले, विनोद पवार, अरविंद भिंगारदिवे, संदीप धामणे अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱयांची नावे आहेत.

नगरचे माजी अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची ऑडिओ क्लिप असून, यामध्ये एका पोलिसाबरोबर झालेले संभाषण व त्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीचा विषय हा चर्चेचा विषय ठरला होता. याची सत्यता पडताळण्याचा आदेश दिल्यानंतर संबंधितांनी पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला होता.

याबाबत नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सात कर्मचाऱयांना निलंबित करण्यात येणार असल्याचे काल जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे. दरम्यान, निलंबित केलेल्या सात कर्मचाऱयांचा अहवाल नाशिकच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या