रस्ते खोदल्याने नगर शहरात वाहतुकीला अडथळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील अनेक भागात रस्त्यांवर केवळ खोदकाम करून ठेवल्याने वाहतुकीला मोठे अडथळे होत आहेत. नगर-मनमाड रस्त्यावर महावीर नगरकडे जाणाऱया रस्त्यावर हॉटेल ओबेरॉय शेजारी मागील महिनाभरापूर्वी भलामोठा खड्डा खोदून ठेवला असल्याने अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच, वाहतुकीलाही मोठा अडथळा ठरत असून, याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

पाण्याच्या पाईपलाईनसाठी संबंधित ठेकेदाराने महावीरनगरकडे जाणाऱया या रस्त्याच्या बाजूने सुमारे 8 ते 9 फूट खोलीचा खड्डा खोदून ठेवला आहे. या पाईपलाईनचे काम महिनाभरापासून बंद पडलेले आहे. त्यासाठी आणलेला पाईपही याच खड्डय़ावर पडलेला आहे. खोदाईमुळे मातीचा मोठा ढिगारा झालेला आहे. हा खड्डा आणि मातीच्या ढिगाऱयामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुकीला अडथळे येत आहेत. रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे साम्राज्य असते त्यामुळे खड्डा, मातीचा ढिगारा दिसत नाही. अनेक वाहनचालक येथे अडखळतात. अनेकदा अपघात घडत आहेत. वाहतुकीतही अडथळे निर्माण होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

हे काम बंद पडलेले असून, महापालिका प्रशासन ते पूर्ण करून घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचेच दिसून येते. महिनोमहिने असे मोठ-मोठे खड्डे बुजविले जात नसल्याने वाहतुकीसाठी तसेच नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत आहेत. महापालिकेने या खड्डय़ांचा धोका ओळखून आता तरी संबंधित ठेकेदारास काम पूर्ण करून खड्डा बुजविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.