जावयाचा खून; सासूसह मेहुण्याला आजन्म करावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलीच्या मृत्यूला जावईच कारणीभूत असल्याच्या संशयावरून जावयाचा खून करणाऱ्या सासूसह मेहुण्याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविली आहे. वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे 2019 साली ही घटना घडली होती. सुनील बाबूराव इंगळे असे खून झालेल्या जावयाचे नाव असून, सासू लीलाबाई अशोक साठे (वय 48) आणि मेहुणा श्रीकांत अशोक साठे (वय 22, दोघे रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत.

सुनील इंगळे याने लीलाबाई साठे हिची मुलगी सुवर्णासोबत 21 जुलै 2010 रोजी सांगली येथे आंतरजातीय विवाह केला होता. लग्नानंतर तीन वर्षांनी सुवर्णा ही ठाणे ग्रामीण पोलीस दलात महिला पोलीस शिपाई म्हणून भरती झाली. सुवर्णा नोकरीत असताना वाटेगाव येथे पतीच्या घरी येऊन-जाऊन होती. 6 फेबुवारी 2015 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुवर्णा वाटेगाव येथील आपल्या घरी आमटी गरम करण्यासाठी स्टोव्ह पेटवीत असताना स्टोव्हचा भडका होऊन भाजून गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारांसाठी कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान 14 फेब्रुवारी 2015 रोजी तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, सुवर्णाला तिचा पती सुनील इंगळे यानेच जाळून मारल्याचा संशय तिच्या नातेवाइकांनी घेतला होता. यावरून 17 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी वाटेगाव-भाटवाडी रस्त्यावरील श्री मायाक्का मंदिरालगत लीलाबाई व श्रीकांत यांनी दगड-विटांनी मारहाण करून सुनीलचा खून केला होता. याप्रकरणी त्याचे चुलते राजाराम इंगळे यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत हिंगे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, मेडिकल ऑफिसर व तपास अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून स्वतःच्या जावयाचा निर्घृणपणे खून केला आहे. क्रूर प्रवृत्तीच्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा समाजामध्ये होऊ नये, असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद आणि साक्षी-पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.