
शहरातील कोतवाली पोलिसांनी 16 फेब्रुवारी रोजी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याचे कनेक्शन मुंबईत निघाले आहे. तपासादरम्यान मुंबईच्या दोघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना अद्यापि यश आलेले नाही.
पवन उर्फ राहुल उर्फ ठाकूरजी उर्फ श्रीकांत सिंग व नकुल पंडित उर्फ सतीश साळवी (रा. मुंबई) अशी दोघांची नावे आहेत. दरम्यान, नगरमध्ये एक कोटीचा गुटखा पकडताच दोघेही पसार झाले आहेत. कोतवाली पोलिसांच्या पथकाने मुंबईत तपास केला. मात्र, त्यांना पकडण्यात यश आले नाही.
कोतवाली पोलिसांनी दुचाकीवरून गुटखा वाहतूक करणाऱया दोघांना पकडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील बोल्हेगाव परिसरात एका शेतामध्ये छापा टाकला. या शेतामधील एका गोडाऊनमधील तीन ट्रक गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुटख्यासह मोबाईल, चार दुचाकी व रोख रक्कम असा एकूण एक कोटी सहा लाख 23 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी 11 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत 10 जणांना अटक केली होती. या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहेत. अटक केलेल्या 10 आरोपींकडील माहितीवरून या गुटख्यासंदर्भात मुंबई येथील सिंग व साळवी या दोघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. हा गुटखा मुंबई येथून नगरमध्ये येत होता का? याचा शोध कोतवाली पोलिसांकडून घेतला जात आहे. मुंबई येथील सिंग व साळवे यांना अटक केल्यानंतरच गुटख्याविषयी आधिक माहिती समोर येणार आहे.





























































