
दुकानात जाऊन वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदाराचे क्यूआर कोड स्कॅनिंग करून ऑनलाइन पेमेंट केल्याचे खोटे मेसेज पाठवून चोरी करणाऱया अंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. यातील चार आरोपींना अटक करून 2 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
संजय अशोक सोनार (वय 19, रा. भोसरी, पुणे), शुभम भगवान सोनवणे (वय 24, रा. इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे), रवी उत्तम पटेल (वय 29), राजू श्रीहरीलाल गुप्ता (वय 29, दोघे रा. थावडे वस्ती, भोसरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वरील आरोपी एखाद्या दुकानात जाऊन वस्तूची खरेदी करत होते. त्यानंतर दुकानदाराकडील क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईलमधील बल्क एसएमएस पाठविण्याच्या ऍपद्वारे संबंधित दुकानदाराला पेमेंट आल्याचा मेसेज पाठवत होते. प्रत्यक्षात दुकानदाराला पैसे मिळत नव्हते. मात्र, संबंधित आरोपी वस्तू घेऊन निघून जात होते.
दरम्यान, अशा पद्धतीने चोरी करणारी टोळी दरेवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दरेवाडी येथील अष्टविनायक मोबाईल शॉपीसमोर संशयास्पद रीतीने उभ्या असलेल्या कारला घेराव घालून कारमधील चौघांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्यांनी अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, सहायक फौजदार नाणेकर, सुनील चव्हाण, नाईक संदीप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश सातपुते, प्रकाश वाघ, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


























































