पारनेर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, काळू नदीवरील दोन पूल गेले वाहून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आह़े  शेवगावनंतर आता पारनेर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, पळशी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. काळू नदीवर वेगवेगळ्या रस्त्यांवर असलेले दोन पूल वाहून गेले असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, नगर शहरातही दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

ढवळपुरी ते वनकुटे व वनकुटे ते पळशी या गावांदरम्यानच्या काळू नदीवरील दोन पूल वाहून गेल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्यांवर दोन्ही पूल आहेत. सोमवारी रात्री 11 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल साडेपाच तासांनंतर पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. संततधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. पाळीव प्राण्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, खरीप हंगामातील काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मोसमी पावसाने राज्याच्या विविध भागात दाणादाण उडवली असताना पारनेर तालुक्यात मात्र पावसाने दडी मारली होती. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण होते. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते. मात्र, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱयांपुढे पुन्हा संकट उभे राहिले आहे. या भागात टोमॅटो तसेच डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जोरदार पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नगर शहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली…

नगर शहरात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे चितळे रोड, दिल्लीगेटसह सर्वच रस्त्यांवर पाणी साचले होते.  काही ठिकाणी घरांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे स्टेशन रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, तेथेही पाणी साचले होते. केडगाव, सावेडी उपनगरांसह एमआयडीसी परिसर आणि नगर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता.