खड्ड्यांमुळे नगर-मनमाड महामार्गाची चाळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठमोठय़ा खड्ड्यांमुळे नगर-मनमाड महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, लहान-मोठ्या सर्वच वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अवजड वाहतुकीसह सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.

नगर शहरातून जाणाऱ्या अनेक महामार्गांपैकी नगर-मनमाड महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा समजला जातो. या मार्गावरून लहान-मोठय़ा वाहनांबरोबरच अवजड वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. या महामार्गावर महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ, शिंगवे व देहरे येथील मोठय़ा शाळा तसेच शहरालगत असलेली एमआयडीसी असल्यामुळे दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या-येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही जास्त असते.

दरम्यान, पावसामुळे या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, विळद ते देहरेपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्यामुळे लहान वाहनधारकांना खड्डे चुकवताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. रस्त्यावर फूट-दीड फुटाचे खड्डे पडले असून, यापूर्वी खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून जोर धरू लागली आहे.

महामार्गावर विळद गाव, विळद पाण्याची टाकी, देहरे दरम्यान मोठे खड्डे असून, पावसाचे पाणी खड्डय़ात साचल्याने अनेक वाहनधारकांना खड्डय़ांचा अंदाज न आल्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक झळ बसत आहे. देहरे बसस्थानक परिसरात रस्त्याची चाळण झाली असून, मोठय़ा प्रमाणात उडणाऱया धुळीचा परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. संबंधित विभागाने याची त्वरित दखल घेत खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनधारक व परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

नगर शहरासह उपनगरांतही रस्त्यांची दुरवस्था

नगर शहरासह उपनगरांतील रस्त्यांची सध्या मोठी दुर्दशा झाली असून, या रस्त्यांवरून वाहने चालविताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील रस्त्यांची आधीच बिकट अवस्था झाली होती. त्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वच रस्त्यांवर खड्डे तयार झाले आहेत.

शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी आतापर्यंत अनेकदा आंदोलनेही केली. मात्र, महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांच्या डागडुजीची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. शहरातील चितळे रोड, शनी चौक, आशा टॉकिज रस्ता, माळीवाडा, वाडिया पार्क परिसर, न्यू टिळक रोड, धरती चौक, हातमपुरासह सर्वच भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.