
कोपरगाव तालुक्यातून ट्रॅक्टर चोरणाऱया टोळीचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, दोनजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचे 12 लाख 20 हजार रुपये किमतीचे चार ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, या टोळीतील तीनजण अद्यापि फरार असून, यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. मंगेश सुदाम वर्पे (रा. कनोली, ता. संगमनेर) व अतुल सखाराम घुले (रा. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.
कोपरगाव तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून ट्रक्टर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. 24 जानेवारी रोजी करंजी येथून उत्तम रायभान चरमळ यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, तर 25 जानेवारी रोजी कोळपेवाडी शिवारातून महेंद्र दीपक कोळपे यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्ॅरक्टर असे दोन दिवसांत दोन ट्रॅक्टर राहत्या घरासमोरून चोरीला गेले होते. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर तपास सुरू केला असता, मंगेश वर्पे याने त्याच्या साथीदारांसह ही चोरी केली आहे. हे ट्रक्टर फायनान्स कंपनीने ओढून आणलेले असून, ते कमी किमतीत मिळतील, असे सांगून आरोपी शेतकऱयांची फसवणूक करत असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना मिळाली होती. त्यांनी कोपरगाव ग्रामीणच्या पोलिसांना कारवाईची सूचना दिली.
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ट्रक्टरचोरी व हेच ट्रक्टर फायनान्स कंपनीचे असल्याचे सांगून शेतकऱयांना विकणार असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून कोपरगावातून चोरलेले दोन, नाशिक जिह्यातील पिपळगाव बसवंत येथून चोरलेला एक आणि संगमनेर तालुक्यातून चोरलेला एक असे 12 लाख 20 हजारांचे चार ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत.
पोलीस निरीक्षक दौलत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकाऱयांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नाईक अशोक शिंदे, कृष्णा कुन्हे, सायबरचे पोलीस नाईक फुरखान शेख, प्रमोद जाधव तसेच कोपरगाव ग्रामीणचे हेडकॉन्स्टेबल निजाम शेख, पोलीस नाईक कोकाटे यांनी ही कारवाई केली आहे.






























































