नगर – अटक टाळण्यासाठी बोठेचा उच्च न्यायालयात अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याने अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली असून, अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

रेखा जरे यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला असून, बाळ बोठे हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी आजवर पाचजणांना अटक केली आहे. बाळ बोठे याने यापूर्वी नगरच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान, पोलिसांनी बोठे याच्याविरोधात स्टॅण्डिंग वॉरंटसाठी पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जरे हत्येनंतर बोठे फरार झालेला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके नियुक्त केली असून, अनेकांचे जाबजबाब घेण्यात आले आहेत. तसेच, बोठेविरोधामध्ये एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली असून, कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यातही दहा लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

स्टॅण्डिंग वॉरंटवर बोठेचा आक्षेप

पोलिसांनी पारनेर न्यायालयात दाखल केलेल्या स्टॅण्डिंग वॉरंटविरोधात बाळ बोठेने ऍड. संकेत ठाणगे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ऍड. ठाणगे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराडे यांच्यासमोर युक्तिवाद केला. ते म्हणाले, बोठे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय व्हायचा आहे. त्याआधीच पोलिसांनी स्टॅण्डिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल केला आहे. बोठेला जामीन मिळवून द्यायचा नाही, असेच यातून दिसते आहे. बोठे अटक टाळत नसून, अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.