
राहुरी तालुक्यातील माहेगाव येथिल दुध डेअरीवर व शिलेगाव येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर अन्न औषध प्रशासनाने छापा मारून दूध भेसळीचे साहित्य जप्त करीत असताना शिलेगाव येथील एका शेतकऱ्यांने अन्न औषध प्रशासनाचे योगेश देशमुख, प्रसाद कसबेकर यांच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण करून अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. राहुरी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील माहेगाव व शिलेगाव येथे दुध भेसळ होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न औषध प्रशासनाचे संजय नरावडे,योगेश देशमुख, राजेश बडे, प्रदीप पवार, प्रसाद कसबेकर आदींनी माहेगाव येथील दुध डेअरीवर तर शिलेगाव येथिल विजय कातोरे या शेतकऱ्यांच्या गोठ्यात दुधभेसळ होत असताना छापा मारला. भेसळीचे दुध जप्त करुन गोडावून व बंगल्यात लपवून ठेवलेली पावडर व केमिकल शोधत असताना येथील शेतकरी व अन्न औषध प्रशासनाचे योगेश देशमुख व प्रसाद कसबेकर यांच्यात बाचाबाची सुरु झाली. तीन ते चार शेतकऱ्यांनी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कपडे फाटे पर्यंत मारहाण केली. देशमुख व कसबेकर यांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एका दूध उत्पादकास राहुरो पोलिसांनी अटक केली आहे. अन्य तीन ते चार जण फरार झाले आहे. राहुरी तालुक्यातील पुर्व भागात अन्न औषध प्रशासनाने अनेक वेळा धाडी टकल्या आहेत.शेतकऱ्यांसह दुध डेअरी चालकांना दुध भेसळ करताना रंगेहाथ पकडले होते. परंतु कारवाई मात्र काहीच न झाल्यामुळे दुध भेसळखोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे. दूध भेसळखोरांवर कारवाईच होत नसल्याने अन्न औषध प्रशानाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्या पर्यंत दूध भेसळखोरांची मजल गेली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात दुध भेसळखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका जणास ताब्यात घेतले आहे. तीन जणांचा पोलीस शोध घेत आहे.

























































