नगर जिल्ह्यात टोमॅटोचे भाव गडगडले; पाच रुपये किलो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोमॅटोचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात हाती येऊ लागले असून, बाजारात आवकही वाढली आहे. मात्र, दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या टोमॅटोला पाच ते सहा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱयांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला. नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव भागातील शेतकऱयांना याचा अधिक फटका बसत आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, पारनेरसह काही भागात टोमॅटोचे मोठे उत्पादन घेतले जाते. जिल्हाभरात साधारण 8 ते 10 हजार हेक्टरवर टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. सध्या टोमॅटोचे पीक जोमात आहे. संगमनेर, अकोले, नगरसह सर्वच बाजार समित्यांत दिवसाला सुमारे एक हजार टन टोमॅटोची आवक होत आहे.

जिल्ह्यातून पुणे, मुंबई, गुजरात व अन्य भागात टोमॅटो विक्रीस नेला जातो. मात्र, मागणी नसल्यामुळे दर पडले आहेत. टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला 40 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

टोमॅटोच्या एका एकरासाठी एक लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. मात्र, दर पाहता विक्रीतून साधा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे टोमॅटो तोडणी करून बाजारात नेण्यास परवडत नसल्याने काही ठिकाणी शेतकऱयांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागासह अकोल्यातील आदिवासी पट्टय़ाला याचा मोठा फटका बसत आहे. नगर शहरातही टोमॅटोचे दर सहा रुपयांच्या आतच आहेत.

संकटाची मालिका सुरूच

नगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर, कोपरगाव भागात टोमॅटोचे उत्पादन अधिक घेतले जाते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून टोमॅटोवर रोगाची बाधा होत आहे. लॉकडाऊनमध्ये दर पडले. त्यानंतर वादळ, अतिपाऊस आदींमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. त्यातून सावरत पुन्हा नव्याने पीक घेण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी आता दर पडल्याने हतबल आहेत.

घोडेगावात कांदा 1800 रुपयांवर

नगर – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची 53 हजार 206 गोण्या (29 हजार 795 क्विंटल) इतकी आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1800 रुपयांपर्यंत निघाले. मोठय़ा मालाला 1650 ते 1700 रुपयांचा भाव मिळाला. मध्यम मोठय़ा मालाला 1500 ते 1600 रुपये, मध्यम मालाला 1400 ते 1500 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 800 ते 1300 रुपये, जोड कांद्याला 300 ते 400 रुपये, तर एक-दोन वक्कलला 1750 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.