
नगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत आठ जण जखमी झाले असून तलवारी,लोखंडीराँड, चाकु व काठ्यांचा वापर केला गेला. या घटनेत सात दुचाकींचीही मोडतोड करण्यात आली असून पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश शिरसाठ रा.शिरसाटवाडी हा अजंठा चौकात दूध विकत असताना त्याच्या टेबलला दुचाकी वरून आलेल्या मुन्ना निजाम पठाण रा. भिकनवाडा,पाथर्डी याच्या गाडीचा धक्का लागला. धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्हीकडच्या लोकांनी एकमेकांना लाठ्या काठ्या आणि तलवारीने मारहाण केली. तसेच यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत सात ते आठ दुचाकीचे नुकसान झाले आहे. दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. अचानक झालेल्या धुमचक्रीने नागरिकांची पळपळ झाली.


























































