
अहमदपूर येथील भक्तीस्थळावर आयोजित कार्यक्रमासाठी आलेले कीर्तनकार शिवानंद उध्दवराव हैबतपुरे (रा. कपाळी गल्ली, उदगीर) यांची गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना महादेव वाडीजवळ मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात 12 जणांवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद हैबतपुरे हे भक्तीस्थळावरील कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून उदगीरकडे निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या गाडीचा काही लोकांनी पाठलाग केला आणि महादेव वाडीजवळ त्यांना अडविण्यात आले. आरोपींनी कीर्तनकार शिवानंद यांना भक्तीस्थळावर पाऊल ठेवल्यास खून करू असे म्हणत त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे लॉकेट, तीन मोबाईल काढून घेण्यात आले. गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या.
या प्रकरणी महादेव धोंडे (रा. बाजीराव शिवडी, जि. नांदेड), शुभम घोडके, नागेश माचुनदरे, हणमंत लांडगे (लोहा जि. नांदेड), सूर्यकांत आणेराव (बेन्नाळी ता. लोहा), कपील भालके (लोहा जि. नांदेड), गोविंद आणेराव (लोहा. जि. नांदेड), राजकुमार मालवडे (अहमदपूर), प्रा. विश्वंभर स्वामी, गुरूराज स्वामी (अहमदपूर) यांच्यासह 13 जणांवर कलम 327, 324, 323, 143, 147, 149, 504, 506, 427 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक हे करीत आहेत.


























































