…यापुढे अर्थखातं टिकेल की नाही सांगता येत नाही, अजित पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज आपल्याकडे अर्थ खातं आहे, म्हणून झुकतं माप मिळतं. पण यापुढे अर्थखातं टिकेल की नाही, सांगता येत नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बारामती दौऱ्यावर होते. तिथे विविध विकासकामांची पाहणीही त्यांनी केली. बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही अजित पवारांनी घेतली. यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात पवार यांनी हे विधान केलं. आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं अर्थखातं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.

‘बारामतीत 42 कोटी रूपये खर्च करून क्रीडा संकुलाचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी मार्केट कमिटीला 5 कोटी रूपये देऊन जागा घेण्यात आली आहे. म्हणजे मार्केटला जागा देताना मी फुकट देतो, पण त्यांची जागा घेताना 5 कोटी दिले,” अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली. तसंच, उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री असताना अनेक योजनांच्या फाइल्स आमच्यापुढं यायच्या. त्यात बघायचं कुठल्या, कुठल्या गावांची नावे आहेत. मग, बारामतीचं नाव नसेल, तर टाकायचं आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला 42 कोटी रूपयांचं मॅग्नेटचं काम मिळालं, असा किस्सा अजित पवार यांनी सांगितला.