दिल्ली हरली, महाराष्ट्र जिंकला! 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकारणाच्याही तसूभर पुढचे साहित्यकारण असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ दरवर्षी चर्चेत असतेच असते. यंदाही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे साहित्य संमेलन दिल्लीत घ्यावे यासाठी प्रचंड दबाव आला. मात्र भीक न घालता साहित्य क्षेत्रातील ‘भीष्म’ अर्थात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीला यजमानपद देण्याचे निश्चित करून मराठी मुलुखाची शान राखली आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलन येत्या मार्चमध्ये नाशिकलाच होणार असल्याची माहिती आज प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महामंडळाचे आगामी 94वे मराठी साहित्य समेलन नाशिकला होणार याविषयी माहिती देण्यासाठी खास बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ठाले म्हणाले की, हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होणार असून, नाशिककरांशी चर्चा करून संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात येतील.

यावेळी साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीने नाशिक येथील लोकहितवादी मंडळाने सुचविलेल्या एज्युकेशन संस्थेला भेट देऊन पाहणी केली आणि अहवाल महामंडळाला दिला. 94व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे (दिल्लीसाठी) एक आणि अंमळनेरचे एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठविले होते, या फेर निमंत्रणात ‘सरहद’ ने मे महिन्यात दिल्लीत संमेलन देण्याची मागणी केली होती. मात्र महामंडळाने स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमत: नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांनी स्थळ निवड समितीच्या शिफारशीची प्रत सर्व सदस्यांना पाठवावी. त्याच वेळी स्थळनिवड समितीचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सर्व मराठी जनतेसाठी संमेलन स्थळाची घोषणा करावी, असे अधिकार स्थळनिवड समितीला व अध्यक्षांना 3 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत साहित्य महामंडळाने दिले होते. त्यानुसार समितीच्या व साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला आयोजित केले जाईल, अशी घोषणा केली आणि नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमत्रण स्वीकारले असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.

पुण्याच्या सरहद संस्थेचा दिल्लीसाठी आग्रह

पुणे येथील सरहद या संस्थेने दिल्ली येथे संमेलन घ्यावे यासाठी नाना तऱ्हेने महामंडळाच्या अध्यक्षांवर दबाव आणला. मात्र पुण्याच्या संस्थेचा दिल्लीसाठी आग्रह का असा सवाल चाणाक्ष ठाले पाटील यांनी करताच आग्रह करणाऱ्यांची बोलती बंद झाली. अनेक मान्यवरांशी झालेल्या चर्चेनंतर ठाले पाटील यांनी नाशिकच्या पारड्यात आपली पसंती टाकून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नयनरम्य वातावयणात साहित्य संमेलन घेण्याची घोषणा करून दिल्लीसाठी आग्रही असलेल्यांना मराठवाडी हिसका दाखवला.

त्याचवेळी सरहदच्या मागणीचा आदर करून दिल्लीकरांसाठी त्यांची तयारी असली तर एक ‘विशेष’ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देण्याचा विधार महामंडळ करील, असे सरहदचे निमंत्रक संजय नहार यांना सुचवले होते. पण नहार यांनी महामंडळाचा हा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संधी हुकवली असेही ठाले म्हणाले.

या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष विलासपूर येथील कपूर वासनिक, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सदस्य डॉ. प्रदीप दाते, वर्धा, प्रकाश पायगुडे, पुणे आणि प्रतिभा सराफ, मुंबई यांची उपस्थिती होती.

24 रोजी अध्यक्षपदाची निवड

23 आणि 24 जानेवारीला नाशिक येथे मार्गदर्शन मंडळाचे बैठक होणार नसून 24 रोजी संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. यासाठी सर्वांनी आपल्या पसंतीची नावे महामंडळाकडे द्यावीत. त्यातून 24 रोजी महामंडळाचे सदस्य अध्यक्षांची निवड करतील असे ठाले पाटील म्हणाले.

व्यासपीठावर राजकारणी नको रे बाबा

महामंडळाच्या वार्षिकांकाच्या भाषणात राजकीय पुढाऱ्यांची उपस्थिती क्वचित राहील. ते कोरोनाच्या परिस्थिवर अवलंबून असेल. यापूर्वी अनेक मोठमोठे नेते व्यासपीठावर आले नाहीत. हा इतिहास आहे. त्यामुळे या संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेते येणार काी नाही याविषयी आयोजकांनी एकही शब्द बोलला नाही. लेखकांचे साहित्य संमेलन असल्याने तेथे राजकीय नेते कशासाठी असा सवाल करून लेखकांचा सन्मान व्हावा अशी आपली अपेक्षा आहे असे ते म्हणाले.

पवारांचा वाढदिवस साजरा करणार असल्याची चर्चा निखालस खोटी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिनित्त संमेलनात सहस्रचन्द्रदर्शन सोहळ होणार असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र ही चर्चा निखालस खोटी आहे. आजतरी कुणी राजकीय नेते व्यासपीठावर असतील याची चर्चा नाही.

यंदाच्या संमेलनात काही नवीन प्रयोगांची शक्यता

यंदाच्या संमेलनात काही नवीन प्रयोग करणार आहोत. संपूर्ण सभामंडप सॅनिटाइझ करणार असून, सभागृहात कोरोनाच्या नियमांचे पालन करू. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करणार असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.

पुढचे साहित्य संमेलन विदर्भात

पुढच्या वर्षीच्या साहित्य संमेलन विदर्भात होणार आहे. मात्र हे संमेलन कोणत्या ठिकाणी होईल याविषयी विदर्भ मंडळच निर्णय घेणार असून त्यानंतर महामंडळ निर्णय घेणार आहे.