अकोले तालुक्यात 11 हजार 580 होम क्वारंटाईन

1993

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील 11 हजार 580 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती  आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांनी दिली.  नगर जिल्ह्यातील आदिवासी अकोले तालुक्यात कोरोना रोगाचा एक ही रुग्ण आढळलेला नाही. मात्र अकोले तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा घराघरात पोहोचून नागरिकांची जनजागृती करीत आहेत. लॉकडाउनला देखील अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोरोना रोगाला तालुक्यातील कुणीही नागरिक बळी पडू नये याची दक्षता प्रशासन अतिशय काटेकोरपणे घेत आहे. अकोले तालुक्यात कोरोना सदृश्य रुग्ण आढळला नसला तरी प्रशासनाने बाहेरून आलेल्या रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे.

पुणे, मुंबईसह इतर दुसऱ्या जिल्ह्यातून राज्यातून व परदेशातून आलेल्या नागरिकांची नोंद आरोग्य विभागाने घेतली असून या सर्वांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले आहे. अकोले तालुक्यात 14 नागरिक हे परदेशावरून आले आहेत, तर 35 जण हे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून अकोले तालुक्यात दाखल झाले आहेत. या सर्वांकडे आरोग्य विभागाची करडी नजर असून दिवसाआड त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आता पर्यंत आरोग्य विभागाने 868 जणांच्या हातावर होम क्वारंटाईन केल्याचा शिक्का मारला आहे. अजूनही जर कुणी बाहेरचा नागरिक गावात दाखल झाला तर त्याची माहिती गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला देणे बंधनकारक आहे. तसेच या होम क्वारंटाईन असलेल्या लोकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात बेड आरक्षित करून ठेवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या