सुक्या मासळीसाठी पर्यटकांचे मोडले कंबरडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुरुड/जंजिरा

 निळाशार समुद्रकिनारा आणि किल्ले जंजिरामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुरुडचा सुक्या मासळीचा बाजारही तितकाच प्रसिद्ध आहे. अस्सल आणि चविष्ट कोळंबी सोडे, जवळा, करदी, आंबाडी, वाकटी येथे मिळत असल्यामुळे मुरुडला येणारे पर्यटक आवर्जून सुक्या मासळी बाजारास भेट देतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठ ते मासळी बाजारपर्यंतचा रस्ताच खड्डय़ात गेला आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत असून पर्यटकांचे कंबरडे मोडत आहे.

मुरुडला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला असून मुंबई, ठाणेकरांचे हे हक्काचे सहलीचे ठिकाण बनले आहे. उन्हाळी सुट्टीतच नव्हे तर विकेएण्डलाही येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल होतात. येथे येणारा पर्यटक बाजारपेठेसह सुक्या मासळी बाजाराला आवर्जून भेट देतो. मुरुडची कोळंबी सोडे हे खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. याशिवाय जवला, करदी, आंबाड, छोटी वाकटी, मोठी वाकटी, मांदेलीही येथे मिळते. पर्यटकच नव्हे तर रायगडवासीयही पावसाळ्याच्या आगोटासाठी येथे सुकी मासळी विकत घेण्यासाठी येतात. त्यामुळे खऱया अर्थाने मे महिना म्हणजे सुक्या मासळीचा हंगाम मानला जातो, पण सध्या बाजारात गर्दी कमी होत आहे. मासळीच्या दुष्काळाने नव्हे तर खराब रस्त्याचा फटका येथील विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे.

रायगडमधील सर्व समुद्रकिनाऱयांमध्ये मुरुडचा किनारा सर्वाधिक सुरक्षित मानला जातो.

किनाऱयावरील पाण्यात हजार मीटरपर्यंत कोठेही खोलगट खड्डे नाहीत.

किनाऱयाला निसर्गाचे वरदान असले तरी शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.

साळाव मुरुड रस्ता खराब असल्याने पर्यटक मुरुडकडे वळत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

तांत्रिक अडचणीत अडकला रस्ता

मुरुडला पर्यटनाचा दर्जा मिळाल्यानंतर शहरांतर्गत रस्त्याची कामे करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी परवानगी देण्यात आली. मात्र निविदा प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमध्ये हा रस्ता अडकला असल्याचे समोर आले आहे. बाजारपेठ ते सुक्या मासळी बाजारापर्यंतच्या रस्त्याची डागडुजीच झाली नसल्याने त्याचा फटका पर्यटकांना बसत आहे. असे असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.