जिल्हा परिषद करणार शेतकऱ्यांच्या मालाची ऑनलाइन विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

वस्तू, कपडे, यांची ऑनलाइन विक्री अनेक कंपन्या करीत असून घरबसल्या आपल्याला आपले सामान मिळत आहे. याच धर्तीवर आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या धान्य आणि भाजीपाल्याचे रायगड जिल्हा परिषद ऑनलाईन विक्री करणार आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादनांसाठी थेट ग्राहक मिळवून देण्यासाठी पेण येथे कायम स्वरुपी मॉल उभारला जाणार आहे. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुंबई गोवा महामार्गावर पेण येथील मार्क्विस मंथन हॉटेल शेजारील मैदानावर 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागा मार्फत कृषी मेळावा आणि प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध भागात उत्पादित होणाऱ्या शेतमालाचे त्याच बरोबर कृषी अवजारे, यंत्रसामुग्री, खत आणि बियाणे, फळ आणि फुल झाडे यांचे 80 स्टॉल लावण्यात येणार आहे. 100 शेतकरी बसतील असे एक छोटेखानी ऑडीटोरीयमही या ठिकाणी तयार केले जाणार आहे. कृषी विभागातील तज्ञ मंडळी याठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन प्रदर्शन आणि विक्रीही केली जाणार आहे. जिल्ह्यातील विवीध विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आणून त्यांना मार्गदर्शन केले जाणर आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी मेळाव्याला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

त्याच बरोबर याच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत लवकरच एक मॉल उभारला जाणार आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील विविध भागात उत्पादित होणाऱ्या शेतीमालाची माहिती आणि विक्री केली जाणार आहे, कृषीमालाला थेट ग्राहक मिळावा यासाठी नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जाणार आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देऊन त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री या केंद्रावर केली जाणार आहे.

अलिबागचा पांढरा कांदा, तोंडली, पेण आणि रोह्यातील भाजीपाला, वाल, माणगाव रोह्यातील कलिंगड, तळा म्हसळ्यात पिकणारी हळद, महाडचा भुईमूग, दिवेआगरची नारळ आणि सुपारी यांचे मार्केटींग आणि विक्री याठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे यावेळी आस्वाद पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा माल हा ऑनलाइन मार्केटिंग द्वारे ग्राहक खरेदी करू शकणार असून तशा प्रकारचे संकेतस्थळ जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपला माल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंदणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक चांगली संधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालून आलेली आहे.