मी वेगळी : गृहिणी ते उद्योजिका

118

>>अलका बोरसे

प्रत्येकामध्ये काहीना काही वेगळेपण असते आणि माझ्यातही आहे. जळगावात मी लहानाची मोठी झाले. सर्वसामान्यांसारखीच मीही एक तरुणी होते. माझे शिक्षण सेकंड इयरपर्यंत झाले. शिकायची खूप इच्छा होती, पण घरच्या जबाबदार्‍यांमुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. मे १९९० साली अनंत बोरसे यांच्याशी माझे लग्न झाले आणि मी शहापूर येथील रहिवासी झाले. त्या काळी कुटुंब मोठमोठीच असायची. तसंच माझं सासरही तेरा-चौदा जणांचं आमचं एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे घरातलं काम करायला कुणी ना कुणी असायचं. त्यामुळे घरात मला तसा मोकळा वेळ बराच मिळायचा. पती बँकेत नोकरीला. घरात बसून राहण्यापेक्षा केवळ उत्सुकता म्हणून शिवणकाम शिकायचं ठरवलं. कपडे शिवायचे ही जबरदस्त इच्छा होती.

शिवणकाम शिकले आणि सुरूवातीला घरच्या घरीच शिवणकाम करू लागले. त्यातच मला सामाजिक कार्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे परिसरातील अनेक सामाजिक कामांमध्ये हिरीरीने भाग घेऊ लागले. त्यात माझे मन छान रमू लागले. याच काळात माझी अनेक महिलांशी ओळखी झाल्या. त्यातून अनेक मैत्रिणी झाल्या आणि त्यांना सोबत घेऊन ‘मैत्रीण ग्रुप’ या सामाजिक संघटनेच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला. या ग्रुपच्या निमित्ताने अनेक लोकांशी संपर्क वाढले.  कालांतराने व्यवसायाचा व्याप वाढू लागल्याने, भाड्याने गाळा घेऊन शहापूर येथेच ‘नारी ब्लाऊझ मेकर्स’ या नावाने गेल्या चार वर्षांत टेलरिंग व्यवसायात चांगला जम बसविलाय. त्यातून तीन-चार जणींना रोजगार उपलब्ध करून देऊ शकले. आता टेलरिंग व्यवसायातील यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि नुकतेच नारायणी कॉस्मेटिक आणि ‘इमिटेशन ज्वेलरी सेंटर’ हे नवीन दुकान सुरू केले. तिथेही एका गरजू महिलेला रोजगार देऊ शकले. पुढील काळात आणखी दोन-तीन जणींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. पती, मोठा दीर तसेच घरातील सगळ्यांचाच पाठिंबा आणि प्रोत्साहन असल्याने मी आज दिवसेंदिवस व्यवसाय वाढ करण्याचा प्रयत्न करतेय. मुलगा प्रतीक आणि सून मोहिनी दोघेही पुण्यात स्थायिक. प्रणव ठाण्यात कॉलेज करतोय.

आपली प्रतिक्रिया द्या