
फिफा वर्ल्ड कपचे आयोजन यंदा आशियात होते, अरब देशात होते. कधी नव्हे ते सर्वाधिक सहा संघांना फिफा वर्ल्ड कपमध्ये स्थानही लाभले होते. तरीही सर्वच्या सर्व सहाही संघ उपांत्यपूर्व फेरीसुद्धा गाठू शकले नाहीत. काल रात्री बलाढय़ ब्राझीलने एशियन सेनसेशन दक्षिण कोरियाचा 4-1ने फडशा पाडत आशियाई संघांचा फिफा वर्ल्ड कपमधला खेळ खल्लास केला. विशेष म्हणजे प्रथमच आशियाचे तीन-तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले होते; पण तिन्ही संघ बाद फेरीच्या पहिल्या टप्प्यातच बाद झाले. ही आशियाई देशांसाठी सर्वात धक्कादायक बाब आहे.
आशियात बरोबर 20 वर्षांपूर्वी जपान आणि दक्षिण कोरियाने संयुक्तपणे सर्वप्रथम फिफा वर्ल्ड कपचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेत दोन्ही यजमान संघांनी बाद फेरीत मजल मारत सर्वांना सुखद धक्का दिला होता. जपानचे आव्हान बाद फेरीतच संपले होते; पण दक्षिण कोरियाने अफलातून कामगिरी करताना उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. उपांत्य फेरीत त्यांना जर्मनीकडून 1-0ने हार पत्करावी लागली होती. त्यानंतर तिसऱया स्थानासाठी झालेल्या लढतीत त्यांचा टर्कीने 2-3 असा पराभव केला होता. त्या वेळी जपान, दक्षिण कोरियासह सौदी अरेबिया आणि चीन हे संघही खेळले होते.
फिफा वर्ल्ड कपमध्ये आजवर लॅटीन अमेरिकन आणि युरोपियन देशांचे वर्चस्व राहिले आहे. 1938 साली डच इस्ट इंडीज म्हणजेच आताची इंडोनेशिया सर्वप्रथम फिफामध्ये आशियाई संघ म्हणून खेळली होती. त्यानंतर 1982पर्यंत कोणताही एक आशियाई देश फिफामध्ये हजेरी लावायला जायचाच. पण 1986 सालापासून दोन आशियाई संघ स्पर्धेसाठी पात्र ठरू लागले. त्यात एक अरब देशांमधला असायचा. 1998 साली जेव्हा फिफा वर्ल्ड कपच्या संघांचा आकडा 32 करण्यात आला तेव्हा प्रथमच चार आशियाई संघांना स्थान देण्यात आले. 2018 साली ते पाच झाले आणि आता सहावर तो आकडा पोहोचला.
कतारमध्ये साखळी स्पर्धेत यजमान संघ वगळता सौदी अरेबिया आणि इराणने चांगली कामगिरी केली. सौदीने अर्जेंटिनाचा केलेला पराभव तर संस्मरणीयच होता. तरीही यजमान कतार, सौदी अरेबिया आणि इराण – तिन्ही अरब देश आपल्या इथे स्पर्धा होत असूनही साखळीतच बाद झाले. पण जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाने अंतिम सोळा संघांत प्रवेश केला. जपान तर ई गटात अव्वल आला. वर्ल्ड कपच्या इतिहासात तिसऱयांदाच एका आशियाई संघाने गटात अव्वल स्थान पटकावले होते. याआधी 2002 साली दोन्ही यजमान संघ आपापल्या गटात अव्वल होते.
2002नंतर पुन्हा एकदा आशियाई संघांकडून खूप अपेक्षा होती; पण एकेक करीत सर्व आशियाई संघ गारद झाले. अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाची झुंज 2-1ने संपवली तर जपान करिश्मा शूटआऊटमध्ये धारातिर्थी पडला. अनपेक्षितपणे बाद फेरीत पोहोचलेल्या दक्षिण कोरियाचा ब्राझीलने 4-1ने धुव्वा उडवून थाटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि बाद फेरीत तिन्ही आशियाई संघ बाद झाले. स्पर्धा आशियात असल्यामुळे आशियाई संघांकडून खूप अपेक्षा होत्या; पण सर्वांनीच अपेक्षाभंग केला. यंदा किमान एका संघाने तरी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारायलाच हवी होती.
आफ्रिकन संघांचीही तीच अवस्था
यंदा कॅमेरून, घाना, सेनेगल, टय़ुनिशिया आणि मोरोक्को हे पाच आफ्रिकन संघ फिफाला पात्र ठरले होते; पण त्यापैकी चार संघ साखळीतच गारद झाले आहेत आणि एकटा मोरोक्को बाद फेरीत पोहोचलाय. त्याचबरोबर उत्तर-मध्य अमेरिका आणि कॅरेबियन देशांमधून कॅनडा, कोस्टारिका, मेक्सिको आणि अमेरिका हे चार संघ पात्र ठरले होते, पण त्या चारही संघांना साखळीतच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यापैकी कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेत 2026 सालचा फिफा वर्ल्डकप संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे आणि हे तिन्ही देश साखळीतच बाद झालेत.
























































