राहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी

12

सामना प्रतिनिधी । राहुरी

तब्बल ३ आठवड्यापासून गायब झालेल्या पावसाने आज शनीवारी सायंकाळी राहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस खरीपाच्या पिकांना तात्पुरते जीवनदान देणारा ठरला आहे.

अर्ध्या तासानंतर या दमदार पावसाच्या सरी मंदावल्या आणि रिमझिम पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. आज शनीवारी सायंकाळी ६ वाजता पावसाला सुरुवात झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या केलेल्या शेतक-यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता. गेल्या तीन आठवड्या पासून पाऊस नसल्याने पेरणी झालेल्या खरीप पिकांनी माना टाकण्यास सुरवात केली होती.

आद्रा नक्षञाच्या सुरवातीला झालेल्या पावसाच्या भरवंशावर शेतक-यांनी बाजरी, मका, सोयाबीन, तूर या खरीप पिकाच्या पेरण्या केल्या आहेत. राहुरी तालुक्यातील खरीपाची १७ गावे असून बहुतांशी भागात खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. माञ ऐनवेळी पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील उतरून पडलेली पिके कोमजून चालली होती. पुष्य नक्षञाला आज शनीवार २० जुलै पासून सुरुवात झाली आहे.

मुळा धरणाच्या लाभक्षेञात आज पावसाने काहीकाळ हजेरी लावली असली तरी पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस गायबच आहे. पाऊस नसल्याने कोतुळ कडुन मुळा धरणात येणारी पाण्याची आवक जवळ जवळ थांबल्यात जमा आहे. आज शनीवारी सायंकाळी कोतुळ कडून मुळा धरणात अवघी ६२५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा ८ हजार ९९ दशलक्ष घनफुट झाला होता.

गेल्या २४ तासात मुळा धरणात अवघे पाच पॉईंट पाण्याची वाढ झाली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाचा पाणीसाठा १२ हजार १६१ दशलक्ष घनफुट तर ३ हजार ४१६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.