
सामना प्रतिनिधी, बीड
बीड लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे. भाजपकडून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी माजी आमदार अमरसिंह पंडित यांना मैदानात आणण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. अवघ्या दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. राष्ट्रवादीच्या आगामी यादीत या नावाचा समावेश असणार आहे, अशी चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, आज किंवा उद्या अमरसिंह पंडित यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते.
पंडित घराण्याची जिल्ह्यात एक वेगळी छाप आहे. विजयसिंह पंडित हे गेवराईची विधानसभा लढवणार आहेत. अमरसिंह पंडित यांचा राजकीय अभ्यास , प्रभावी भाषणशैली, या सहा गावागावात असणारे कार्यकर्ते, गेवराईमध्ये त्यांच्या उमेदवाराने मिळणारा मोठा फायदा, कारखाना, शिक्षण संस्था, इतर संस्थेचे पसरलेले जाळे, याचा थेट फायदा अमरसिंह पंडितांना उचलता येऊ शकतो असा राजकीय अंदाज राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा आहे. म्हणूनच अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.
दुसरीकडे भाजपाकडून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची घोषणा या पूर्वीच करण्यात आली आहे. तिसऱ्या आघाडीचा ही उमेदवार मैदानात येऊ शकतो. मात्र, बीड लोकसभेची निवडणूक लढत दुरंगीच होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे.































































