भाजपची घराणेशाही एकदा बघा, अंबादास दानवे यांचे मिध्यांना जोरदार प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून घराणेशाही मोडीत निघाली, असे म्हणणाऱ्या मिंध्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री महोदय, भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा, असे सांगत दानवे यांनी राजकारणातील घराणेशाहीची भाजप आमदारांची यादीच सादर केली आहे.

ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे 40 आमदार भाजपची पालखी धापा टाकत वाहत आहात त्याच भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा. 2019 साली महाराष्ट्रातील भाजपचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांचा काwटुंबिक राजकीय वारसा देतो आहे. पहा, वाचा. कारण याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागणार आहे. यापुढे देशाची यादी लागली तरी सांगा, असा टोला दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला आहे.

रस्त्यावरील शिवसैनिक पारखून, त्याला निवडून आणण्याचे काळीज फक्त शिवसेनेत आहे. आयात उमेदवारांची जत्रा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन फिरत आहात. कायदेशीर लढाया येतील आणि जातील. कायम असेल ती निष्ठा आणि विश्वास, असे दानवे म्हणाले.

नेते, आमदारांचा राजकीय वारसा

देवेंद्र फडणवीस (भाजपचे आमदार गंगाधरराव फडणवीस यांचे पुत्र), पंकजा मुंडे (माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या), आकाश फुंडकर (भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र), संतोष दानवे (सध्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र), सिद्धार्थ शिरोळे (माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र), हेमंत सावरा (माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र), देवयानी फरांदे (माजी सभापती ना. स. फरांदे यांच्या सुनबाई), समीर मेघे (माजी खासदार दत्त मेघे यांचे पुत्र), राणाजगजितसिंग पाटील (माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे पुत्र), नमिता मुंदडा (माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या सूनबाई), राधाकृष्ण विखे पाटील (माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे पुत्र), वैभव पिचड (माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र), नितेश राणे (केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र).