
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘ऍण्टिलिया’ या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. त्या प्रकरणाबाबत आज एक गंभीर माहिती समोर आली. ही गाडी सापडल्यानंतर अंबानींच्या मोबाईलवर धमकीचा टेलिग्राम मेसेज आला होता. तो मेसेज दिल्लीतील तिहार जेलमधील दहशतवाद्यांच्या बराकीतून आला होता. त्यामुळे तपास यंत्रणा आणखीनच दक्ष झाल्या आहेत.
मुकेश अंबानी यांना आलेला टेलिग्राम मेसेज ज्या क्रमांकावरून आला होता तो क्रमांक तिहार जेलमध्ये वापरला जात होता. ज्या बराकीतून तो मेसेज पाठवला गेला त्या बराकीत जैश-ए-मोहम्मद आणि इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसह 15 जणांना ठेवण्यात आले आहे. त्यापैकी कोणी हा मेसेज पाठवला होता का याचा तपास आता दिल्ली पोलीस करीत आहेत.
एका इंग्रजी दैनिकाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. एका खासगी सायबर एजन्सीचा हवाला त्यात देण्यात आला आहे. ‘जैश उल हिंद’ या कथित दहशतवादी संघटनेने टेलिग्राम चॅनेलद्वारे स्फोटके ठेवल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ते चॅनेल तिहार तुरुंगातच बनवले गेले होते असे या वृत्तात म्हटले आहे. या खासगी सायबर एजन्सीला देशातील एका महत्त्वाच्या तपास संस्थेने एक फोन ट्रक करण्यास सांगितले होते. अंबानींना ज्या फोनवरून धमकीचा मेसेज आला तोच तो फोन होता आणि त्यावरच टेलिग्राम चॅनेल बनवण्यात आले होते, असे समोर आले आहे.
सिमकार्डचे लोकेशन तिहारमध्ये
खासगी सायबर एजन्सीने यासंदर्भात अहवाल बनवून तो तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. त्यानुसार संबंधित टेलिग्राम चॅनेल 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता ‘टोर’ नेटवर्कद्वारे बनवले गेले होते. या नेटवर्कचा वापर जगातील दहशतवादी संस्था करतात. या नेटवर्कद्वारे डार्क वेबचा वापर केला जातो. पारंपरिक सर्च इंजिन्सवरून ती माहिती मिळवणे अशक्य असते. त्यासाठी फक्त ‘टोर’ नेटवर्कच वापरावे लागते आणि त्यामधील तज्ञ मंडळीच ते काम करू शकतात. टेलिग्राम चॅनेल बनवायला ज्या सीमकार्डचा वापर केला गेला त्या कार्डचे लोकेशन तिहार तुरुंगातील होते.






























































