
आंबेगाव तालुक्यात मागील काही महिन्यात बिबट्यांचा प्रादुर्भाव थांबला होता परंतु मागील महिन्यापासून बिबट्यांचे हल्ले, बिबट्यांचे दर्शन सुरू झाले आहेत. त्यातच नागापूर (ता.आंबेगाव) येथील मिंडे वस्तीत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर शनिवारी (दि.23) सायंकाळी जेरबंद झाला. यामुळे वनविभाग व स्थानिक शेतकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील मिंडे वस्ती, गडदे वस्तीत गेल्या दोन महीन्यांपासून बिबट्याने अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. या घटनेमुळे नागरिक बिबट्याच्या दहशतवादी खाली राहत होते. गडदे वस्ती येथिल एकनाथ शंकर वाघ या शेतकऱ्याच्या तीन शेळ्या बिबट्याने गोठ्यात घुसून ठार केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच मिंडे वस्तीत रात्रीच्या वेळी कांचन तेजस मिंडे या रस्त्याने जात असताना त्यांच्यासोबत चाललेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला जागीच ठार केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा याच वस्तीत सोमनाथ मच्छिंद्र मिंडे हे वीजपंप सुरु करण्यासाठी रात्रीच्या वेळी गेले असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले होते.
बिबट्याची दहशत वाढतच चालली होती . त्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले होते . शेतकरी विजय चासकर व ग्रामस्थ यांनी वन विभागाला पिंजरा लावण्यासाठी पाठपुरावा केला.अखेर शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी वनविभागाने पिंजरा लावला. परंतु बिबट्या जेरबंद होत नव्हता. वनविभागाने दोन तीन जागा बदलून देखील पिंजरा लावला. त्यानंतर नंदू शत्रुघ्न पोहकर यांच्या शेतात शनिवारी (दि. 23) सकाळी रोजी पिंजरा लावला. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे.




























































