मी डॉक्टर आहे का, अमित शहा यांचा विरोधकांना डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संसदेत कलम 370 रद्द करण्याच्या मांडलेल्या प्रस्तावावर जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला अनुपस्थित असल्याकडे लक्ष वेधले. त्यांच्याशिवाय ही चर्चा पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगितले. फारुख अब्दुल्ला यांना अटक करण्यात आलेली नाही किंवा त्यांना ताब्यातही घेण्यात आलेले नाही, तसेच ते नजरकैदेतही नाहीत. ते सदनात त्यांच्या इच्छेनेच अनुपस्थित आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे ते अनुपस्थित असतील, तर मी डॉक्टर आहे का, मी डॉक्टर नाही आणि मी औषधे देऊन कोणाचीही प्रकृती सुधारू शकत नाही, असा डोस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना दिला.

कश्मीरमधील अनेक नेते संसदेत अनुपस्थित आहे. सरकारने बळाचा वापर करून त्यांना अटक केली आहे किंवा नजरकैदेत ठेवले आहेत. कश्मीरबाबतच्या महत्त्वाच्या चर्चेवेळी ते सदनात उपस्थित असायला हवे असे मत समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी व्यक्त केले. सरकार बळाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कश्मीरमधील नेते सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या नेत्यांबाबत सरकारने माहिती द्यावी असेही अखिलेख म्हणाले. प्रकृती अस्वास्थामुळे कोणताही नेता गैरहजर असेल तर आपण काहीही करू शकत नाही. आपण डॉक्टर नाही, असे स्पष्ट करत अमित शहा यांनी विरोधकांची बोलती बंद केली.