‘महानायक’ बिग बींचा अवयवदानाचा संकल्प

बॉलीवूडचे ’महानायक’ अमिताभ बच्चन यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बी यांनी ट्विटच्या माध्यमातून आज ही माहिती दिली. ’मी अवयवदानाची शपथ घेतलेय. मी या पवित्र कार्याचे प्रतीक असलेली हिरवी रिबीन लावलेय,’ असे ट्विट अमिताभ यांनी केले. सोबत एक फोटोही पोस्ट केला. यात त्यांनी त्यांच्या सूटवर ग्रीन रिबीन लावलेली दिसतेय.

77 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बिग बींच्या निर्णयाचा आदर करत अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहे. तसेच त्यांच्याकडे मदत मागितली आहे.

तुम्ही डोनर बनू शकत नाही; ट्विटर वॉर रंगले!
अमिताभ यांच्या या ट्विटवर त्यांच्या फॉलोअर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने तर चक्क ‘तुम्ही डोनर बनू शकत नाही,’ असे लिहिले. सर, हिपेटाइटिस-बी होता. त्यामुळे तुमचे अवयव अन्य कोणत्याही व्य़क्तीला दान करता येणार नाही. सोबत तुमचे लिक्हर ट्रान्सप्लांटही झाले आहे, तुम्ही औषधांवर आहात. तुम्ही अवयवदान करून इतरांना जीवनदान देऊ इच्छिता, या भावनेचा मी आदर करतो. मात्र माफ करा, शास्त्रीयदृष्टय़ा तुम्ही एक डोनर बनू शकत नाही, असे एका युजरने यावर लिहिले.

या युजरच्या ट्विटला खुद्द अमिताभ यांनी उत्तर दिले नाही. पण एका चाहत्याने मात्र यावर उत्तर दिले. ‘ते डोळे, किडनी, हृदय डोनेट करू शकतात. या बकवास गोष्टी बंद कर. त्यांनी एक चांगला संदेश दिला आहे,’ असे या चाहत्याने लिहिले.

15 तास कामाचा टास्क
कोरोनावर मात केल्यानंतर अमिताभ बच्चन ‘केबीसी 12’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या वयातही त्याचे शूटिंग मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. आज त्यांनी शूटिंगसाठी निघताना कारमध्ये बसलेला स्वत:चा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. चला मित्रांनो, मी कामावर जातोय. पेंगोलिन मास्क लावून, 15 तास काम करायचंय, हाच आहे टास्क!, असे त्यांनी लिहिलंय.

आपली प्रतिक्रिया द्या