खेल खतम, पैसा हजम;‘ब्लू टीक’वरून अमिताभ बच्चन यांची ट्विटरवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘ब्लू टीक’वरून पुन्हा एकदा ट्विटरवर जोरदार निशाणा साधला आहे. सोमवारी त्यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. एक मिलिअन फॉलोअर्स असून ज्यांनी पैसे भरले नाहीत, त्यांच्या नावासमोरचे ब्लू टीक अजूनही तसेच आहे ही बाब त्यांनी या ट्विटमधून लक्षात आणून दिली आहे.

ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी 20 एप्रिलपासून ‘ब्लू टीक’ कुणालाही मोफत मिळणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ज्यांनी ‘ब्लू टीक’चे सबस्क्रिप्शन घेतले नाही त्यांचे ब्लू टीक हटवण्यात आले होते. अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी, राजकारण्यांना याचा फटका बसला होता. मात्र अमिताभ बच्चन यांनी सबस्क्रिप्शनचे पैसे भरूनसुद्धा त्यांचे ‘ब्लू टीक’ हटवण्यात आले होते. त्या वेळी ट्विट करत बिग बी यांनी ट्विटरचे लक्ष वेधले होते.

   अमिताभ यांनी सोमवारी पुन्हा एक ट्विट केले आहे. त्यातही त्यांनी ‘ब्लू टीक’चा उल्लेख केला आहे. “ए, ट्विटर! मी ब्लू टीकसाठी पैसे भरले आणि आता तुम्ही म्हणताय की ज्यांचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत त्यांना ब्लू टीक फ्रीमध्ये मिळणार. माझे तर 48.4 मिलियन फॉलोअर्स आहेत, आता? खेल खतम, पैसा हजम?’’ असे अमिताभ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्विटरने तुमची फसवणूक केली अशा आशयाच्या कमेंट्स युजर्सनी दिल्या आहेत.