कौन बन गया करोडपती? अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेलिब्रिटी कुठेही गेले की चाहत्यांना गराडा पडतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी किंबहुना स्वत:च्या सुरक्षेसाठी त्यांना अंगरक्षक ठेवावे लागतात. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांसोबत अंगरक्षकांची फौज दिसून येते. त्यातील अनेक कलाकारांचे अंगरक्षकही ‘सेलिब्रिटी’ झाले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत गेली अनेक वर्षे अंगरक्षक म्हणून सोबत राहणारे पोलीस कॉन्स्टेबल हेसुद्धा त्या सेलिब्रिटींपैकीच एक आहेत. पण त्यासाठी अमिताभ यांच्याकडून त्यांना वर्षाला दीड कोटी रुपये पगार दिला जातो अशी चर्चा रंगल्याने शिंदे यांची पोलीस आयुक्तांनी उचलबांगडी केली आहे.

जितेंद्र शिंदे हा मुंबई पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल आहेत. 2015 पासून ते अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात आहेत. शिंदे यांची स्वत:ची सुरक्षा एजन्सीही आहे जी त्यांच्या पत्नी चालवतात. शिंदे यांना अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी सरकारी पगार मिळतो. बरोबरच त्यांना अमिताभ यांच्याकडूनही वार्षिक दीड कोटी रुपये पगार मिळतो अशी कुणकुण लागताच ती खबर थेट पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर शिंदे यांना अमिताभ यांच्या पोलीस सुरक्षेतून हटवून पोलीस ठाण्यात तैनात केले गेले.

नामांकित कंपन्यांच्या सीईओंपेक्षाही जास्त पगार

जितेंद्र शिंदे यांना वर्षाला दीड कोटी म्हणजे महिन्याला सुमारे 12 लाख रुपये पगार अमिताभ यांच्याकडून मिळत होता. पगाराचा हा आकडा एखाद्या नामांकित कंपनीच्या सीईओच्या पगारापेक्षाही जास्त असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. शिंदे हे बच्चन कुटुंबीयांना आपल्या सुरक्षा एजन्सीद्वारेही सुरक्षा पुरवत असल्याने इतका पगार घेत होते असेही म्हटले जात आहे.

चार वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी असल्याने बदली

मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस कर्मचारी एका पदाकर, एकाच पोलीस ठाण्यात चार वर्षांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही असे आदेश काढले होते. त्याच नियमांतर्गत जितेंद्र शिंदे यांची बदली डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शिंदे यांच्या विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आल्याचे समजते. अमिताभ यांच्या अकाऊंट्स विभागातूनही त्यासंदर्भात माहिती मागवण्यात आली आहे.