अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजना- 75 लाख प्रवासी असलेल्या मुंबईच्या तोंडाला पाने पुसली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> बापू सुळे

अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल 25 हजार कोटी रुपये खर्चून देशातील 508 स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. रेल्वेने या योजनेचा मोठा गाजावाजा करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला खरा, पण दैनंदिन प्रवासी संख्या 75 लाखांहून अधिक असलेल्या मुंबईची मात्र तुटपुंज्या निधीवर बोळवण केली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई विभागातील केवळ तीन स्थानकांचा विकास केला जाणार असून त्यावर 65 कोटी रुपये एवढी तुटपुंजी रक्कम खर्च केली जाणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना केवळ साडेतेरा हजार कोटी रुपयांवर बोळवण केली होती. तीच परंपरा कायम ठेवत अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेत कायम ठेवत मुंबईला आणि महाराष्ट्राला निधी देताना आखडता हात घेतला आहे. रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येचा विचार करता मुंबई आणि परिसरात 25 टक्क्यांहून अधिक प्रवासी आहेत. त्यातून रेल्वेला मोठा महसूल मिळतो, मात्र मुंबईला देताना केंद्राकडून आखडता हात घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात देशातील 508 स्थानकांचा विकास केला जाणार असून त्यावर जवळपास 24 हजार 470 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रवासी संख्या विचारात घेता मोठा निधी देऊन येथील जास्तीत जास्त स्थानकांचा विकास करणे गरजेचे होते. मात्र रेल्वेने केवळ मुंबई विभागातील परळ, कांजुरमार्ग आणि विक्रोळी या तीन स्थानकांचा सदर योजनेतून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या लोकल प्रवासादरम्यान सुरू असलेल्या हालअपेष्टा कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान तुपाशी, महाराष्ट्र उपाशी

रेल्वे स्थानक विकास योजनेंतर्गत 27 राज्यांतील विविध स्थानकांचा विकास केला जाणार आहे. त्यानुसार निधी देताना सरकारने दुजाभाव केल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 55 स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशसाठी चार हजार कोटी रुपये, तर राजस्थानला चार हजार कोटी रुपये एवढा मोठा निधी दिला आहे. महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा या योजनेत समावेश असला तरी केवळ 1696 कोटी रुपये एवढा कमी निधी दिला आहे. यावरून उत्तर प्रदेश, राजस्थान तुपाशी आणि महाराष्ट्र उपाशी असल्याचे चित्र आहे.