शिवसेनेचा अंधेरीत जोरदार प्रचार,घराघरात मतदानाबाबत जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या मतदारसंघात लटके यांचाच विजय निश्चित असल्याने आता घराघरात मतदानाविषयी जनजागृती करून नागरिकांना त्यांचा हक्क बजावण्याचे आवाहन शिवसेनेकडून केले जात आहे. एकीकडे ऋतुजा लटके यांचा प्रचार करतानाच शिवसेनेकडून निवडणूक आयोगाच्या मतदानाच्या जनजागृतीची मोहीमच पार पाडली जात आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह अंधेरीपुरते मर्यादित न राहता मुंबईच्या कानाकोपऱ्यातील मतदारांपर्यंत पोहोचले आहे. अंधेरीतही चौकसभा, पदयात्रा, मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. भाजप उमेदवाराने या मतदारसंघातून उमेदावारी मागे घेतली असली तरी आपकी अपनी पार्टीचे (पीपल्स)चे बाला वेंकटेश विनायक नाडार, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज नायक, अपक्ष नीना खेडेकर, फारहान सिराज सैयद, मिलिंद कांबळे, राजेश त्रिपाठी हे उमेदवार अद्यापही रिंगणात आहेत. ऋतुजा लटके यांच्या तुल्यबळ हे उमेदवार नसले तरी आणि विजय निश्चित असला तरी मतदारांमध्ये जनजागृतमी कशी करता येईल याकडे येथील शिवसैनिकांचा अधिक भर आहे. यामुळे मशाल निशाणी मतदारांपर्यंत पोहोचत आहेच, शिवाय मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठीही प्रवृत्त केले जात आहे.

ऋतुजा लटके यांचे सर्वत्र स्वागत

ठिकठिकाणी ऋतुजा लटके यांच्या प्रचार फेऱ्यांचे नागरिकांकडूनही स्वागत होत आहे. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच मतदान करून निवडून आणणार अशी ग्वाही येथील मतदारांकडून दिली जात आहे.