
अंगडिया खंडणी प्रकरणातील फरार आरोपी उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या बहिणीचे पती आणि यूपीतील सहाय्यक जीएसटी आयुक्त आशुतोष मिश्रा (38) यांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. सौरभ त्रिपाठी यांनी मुंबईतून हवालामार्फत पाठवलेली रक्कम मिश्रा यांनी तिकडे स्वीकारल्याचे तपासात समोर आल्याने अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईच्या पोफळवाडीतील अंगडियांकडून पैसे उकळल्या प्रकरणी अंगडिया असोसिएशनच्या सदस्यांनी तक्रार दिल्यानंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या तिघा अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली. मात्र गुन्हा दाखल झाला त्या दिवसापासून उपायुक्त सौरभ त्रिपाठी पसार झाले. दरम्यान, तपासात त्रिपाठी यांचाही सहभाग समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांनाही आरोपी दाखवले. तेव्हापासून गुन्हे शाखा सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेत आहे. मात्र अजून त्रिपाठी यांचा थांगपत्ता लागलेला नाही. दरम्यानच्या काळात पोलिसांनी लखनौच्या गोमती नगर येथील त्रिपाठी यांच्या घरी घरकाम करणारा पप्पू गौड यालादेखील अटक केली. त्रिपाठी यांनी हवालामार्फत जो पैशांचा व्यवहार केला त्यात त्यांचे भावोजी आशुतोष मिश्रा यांचादेखील सहभाग समोर आल्याने पोलिसांनी यूपीतल्या बस्तीमधून त्यांना अटक केली. त्यांना ट्रांझीट रिमांडवर मुंबईत आणण्यात येत आहे.





























































