संतप्त कांदा उत्पादकांनी सटाणा-मालेगाव रस्ता रोखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | सटाणा

तब्बल आठ दिवसांपासून बंद असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव आज सुरळीत होण्यापूर्वीच कांदा व्यापाऱयांनी कांदा लिलाव सुरू न केल्याने कांदा व्रिकीसाठी आलेल्या संतप्त कांदा उत्पादकांनी बाजार समिती कार्यालयाबाहेर घोषणा देऊन सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावर उतरून रास्ता रोको केला.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार 28 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. तर आज गुरुवार, 4 एप्रिल रोजी लिलाव घेऊन पुनश्च शुक्रवार, 5 एप्रिल रोजी अमावस्येनिमित्त बाजार समितीमधील व्यापार बंद ठेवण्यात येऊन 8 एप्रिलपासुन दैनंदिन लिलाव सुरू होणार होते.

गुरुवारी सकाळी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी वर्गाने आपला साठविलेला नवीन कांदा विक्रीसाठी बाजार समिती आवारात आणला होता. मात्र बाजार समिती प्रशासनाने लिलावात भाग घेणाऱया व्यापाऱयांना आपल्या परवान्यामधील तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासंदर्भात सूचित केले होते. यामुळे बाजार समिती प्रशासन व व्यापारीवर्गात समन्वय न होऊ शकल्याने सकाळी कांदा लिलावास प्रारंभ होऊ शकला नसल्याचे एका व्यापाऱयाने सांगितले.

संचालक मंडळाची सभा

परिणामी कांदा विक्रीसाठी आलेल्या कांद्याचा लिलाव न झाल्याने संतप्त शेतकरी वर्गाने रस्त्यावर येत रास्ता रोकोस प्रारंभ केला. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ झालेल्या रास्ता रोकोमुळे पोलीस प्रशासन व बाजार समिती प्रशासनाची धावपळ उडाली. दरम्यान, बाजार समिती सभापती मंगला सोनवणे यांनी तातडीने संचालक मंडळाची सभा घेऊन दुपारी 2 वा. बाजार समितीमधील कांदा लिलाव सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी वर्गाने रास्ता रोको मागे घेतला.