
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आता आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यावाच लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. एका आठवडय़ाच्या आत सुनावणी घ्यायची असून त्यानंतर पूर्ण कार्यक्रमाचेही वेळापत्रकही द्यायचे आहे. त्यामुळे आता कोणाचीही सुटका नाही, असे आमदार परब म्हणाले.
सभापती किंवा उपसभापती याचिका ऐकतात, पण सभापती नसेल तर उपसभापती हे अपात्रतेसंदर्भातील याचिका ऐकतात. परंतु विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे यांच्याविरुद्धही अपात्रतेची याचिका आहे. त्यामुळे हे ऐकणार कोण? असा सवालही आमदार परब यांनी केला. विधान परिषदेचे इतर जे दोन सदस्य आहेत मनीषा कायंदे आणि विप्लव बिजोरिया यांच्या याचिका सभापती गोऱहे ऐकतील. कारण अपात्र होत नाही तोपर्यंत त्या सभापती राहतील; परंतु या सर्व गोष्टींना आव्हान देण्यात येणार असून जर त्यांनी आणखी टंगळमंगळ केली तर जसा खालच्या सभागृहाला सर्वोच्च न्यायालयाचा दट्टय़ा मिळाला तसा वरच्या सभागृहालादेखील मिळेल, असेही अनिल परब म्हणाले.

























































