
सामना प्रतिनिधी, पारनेर
पुणे जिल्ह्यातील चिल्हेवाडी धरणातून पारनेर तालुक्यासाठी किमान पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा करताना मान्य केले.
चिल्हेवाडी धरणातून पारनेर तालुक्यातील दहा गावांना पाणी देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे जलसंपदा विभागाने आदेश दिले असून त्यासाठी 25 लाखांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. परंतु या गावांना पाणी देण्याबरोबरच पिढयान्पिढया पाचविला पुजलेल्या दुष्काळास कायमची तिलांजली देण्यासाठी या धरणाचे पाणी पिंपळगावरोठा गावच्या पठारावर आणून सोडल्यास तालुक्याच्या कोणत्याही कोपऱ्यापर्यंत हे पाणी पोहचविता येईल. शेतीसाठी नाही तर किमान पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रस्ताव शासनाने मान्य केल्यास दुष्काळात शासनाचा टँकरवर होणारा कोट्यवधी रूपयांचा खर्च वाचणार आहे. ही बाब कोरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हजारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हजारे यांनी या प्रस्तावाची सविस्तर माहीती घेतली. त्यासंदर्भात शासनाकडून त्यांनी तांत्रिक माहितीही मागविली असून आपण त्यासाठी कोरडे व त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे हजारे यांनी मान्य केले. शिष्टमंडळाशी हजारे यांनी तासभर सविस्तर चर्चा केली. सनदी अधिकारी गणेश पोटे, तालुका पत्रकार संघाचे सचिव शरद झावरे यावेळी उपस्थित होते.
चिल्हेवाडी धरणाची क्षमता एक टिमएमसी असून पाउस सुरू झाल्यानंतर अवघ्या सात दिवसात हे धरण भरते. धरणक्षेत्रात पाउस सुरू असेपर्यंत धरणातून सुमारे आठ ते दहा टीएमसी पाणी वाहून जाते. वाहून जाणारे हेच पाणी आडवून ते पारनेर तालुक्याला मिळावे अशी योजना आहे. त्यासाठी धरणाचे खोलिकरण तसेच उंची वाढविली गेल्यास पारनेरसाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. या धरणातील पाणी पारनेरच्या हदीजवळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील गुंजाळवाडी पर्यंत बंद पाईपलाईन द्वारे शेतीसाठी देण्यात येणार आहे. या कामासाठी शासनाने शंभर कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून ते काम सध्या प्रगतीपथावर आहे. याच योजनेतून पाणी उचलून ते तालुक्याच्या पठारावर आणणे शक्य आहे.
सर्वपक्षीय पाठींबा हवा
चिल्हेवाडी धरणातून तालुक्यासाठी पाणी आणणे सहज शक्य असून शासकिय अधिकाऱ्यांनीही तशी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. शासनदरबारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे शिष्टाई करणार असून सर्वपक्षियांनी जनआंदोलन उभारून या मागणीसाठी पाठींबा देण्याचे अवाहन विश्वनाथ कोरडे व तालुका पत्रकार संघाचे सचिव शरद झावरे यांनी केले आहे.
हजारे, महाजन, विखे हवाई पाहणी करणार
ही योजना राबविण्यापूर्वी अण्णा हजारे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खासदार डॉ. सुजय विखे हे धरण क्षेत्रापासून पारनेर तालुक्याच्या पठारापर्यंत हवाई पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर शासनाकडे ही योजना मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे कोरडे यांनी सांगितले.


























































