कांद्याला योग्य भाव आणि आयात धोरण थांबविण्यासाठी अण्णा हजारेंना साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

चालू वर्षी महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पाण्याअभावी रब्बी व खरीप पिके पूर्णतः वाया गेली आहेत. शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवून देणारे कांदा पीक दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडले आहे. अशाही परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून कांदा पीक घेतले आहे. दुष्काळामुळे कांदा पीक निम्म्याने घटले आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने कांदा आयात धोरण राबविल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या कांदा पिकास योग्य भाव मिळावा व शासनाने कांदा आयात धोरण थांबवावे यासाठी शेतकऱ्यांनी अण्णा हजारेंना साकडे घातले आहे.

कांदा बाजारभावात दररोज घसरण चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने उत्पादनावर आधारित 50% नफा धरून कमीत कमी 20 रुपये प्रती किलो दराने बाजारभाव मिळावा व शासनाने कांदा आयात धोरण थांबवावे, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देऊन चांबुर्डीचे सरपंच दादासाहेब ढगे, प्रगतशील शेतकरी बबनराव दिघे, नीलेश ढगे आदींनी चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या कांदा पिकास योग्य भाव मिळावा व शासनाने कांदा आयात धोरण थांबवावे, अशा आशयाचे निवेदन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देऊन चर्चा करताना चांबुर्डीचे सरपंच दादासाहेब ढगे, प्रगतशील शेतकरी बबनराव दिघे, नीलेश ढगे आदी. (छाया: समीर मन्यार, नगर.)