
सामना ऑनलाईन । मुंबई
डिसेंबर महिन्यात तापमानाचा पारा घसरल्यामुळे देशभरात थंडीची लाट पसरली होती. महाराष्ट्रात मात्र गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने थंडीमुळे कुडकुडलेल्यांना काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 6 जानेवारीपासून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरातमध्ये थंडीची लाट पसरणार आहे.
‘गेल्या तीन ते चार दिवस आधीपासून तापमानात थोडी वाढ होत होती. मात्र उत्तरेकडील काही राज्यांमध्ये तापमान शून्य अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी पुन्हा वाढणार आहे. याचा सर्वाधिक प्रभाव मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर दिसून येणार आहे. या दिवसात ढगाळ वातावरण राहील असे पुण्याच्या हवामान खात्याचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.



























































