मदत दहशतवादाविरुद्ध!!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर (निवृत्त)

आपले हिंदुस्थानी लष्कर. आज तालिबानविरुद्ध लढण्यासाठी अफगाणिस्तानला मदत करतंय. येथील लष्करातील महिला अधिकारी आपल्याकडे सैनिकी प्रशिक्षण घेत आहेत. यंदाचे हे त्यांचे तिसरे वर्ष आहे.

आतंकवाद…तालिबान, अलकायदा, आयएसआय…हे जे आतंकवादी युद्ध जे सध्या जगभरात सुरू आहे, या युद्धात सर्वात जास्त नुकसान महिलांचं आणि लहान मुलांचं होतं. याला एकही राष्ट्र अपवाद नाही. त्यातल्या त्यात सर्वात जास्त नुकसान हे अफगाणिस्तानातील महिला आणि बालकांचं झालंय. त्यानंतर सीरिया, इराक, लिबिया या राष्ट्रांमध्ये महिलांवर खूप अत्याचार झाले आहेत. या कारणामुळे गेल्या दोन वर्षांत या देशांतील लोकांनी मोठय़ा प्रमाणात दुसऱया देशांत स्थलांतर केले आहे.

अफगाणिस्तान हे आपले मित्र राष्ट्र आहे. अनेक देशांचे आपल्याला असे सांगणे आहे की, हिंदुस्थानी सैनिकांनी तिथे जाऊन काम करावे. अमेरिकाही सातत्याने म्हणते, तुम्ही आपल्या सैन्याला तिथे पाठवा, मात्र हिंदुस्थानची भूमिका अशी आहे की, आम्ही कोणत्याही राष्ट्रात आपले सैनिक पाठवणार नाही. हिंदुस्थानी सैनिक जगभरात फक्त संयुक्त राष्ट्र संघ (युनायटेड नेशन) या ध्वजाखालीच काम करतात.

आज 12 देशांत आपले सैनिक काम करतात. ज्याला आपण ‘शांतीसेना’ असे म्हणतो. आपण विशेषतः अफगाणिस्तानाची मदत करतोय. जे नुकसान आतंकवादी शक्तींनी तिथे केलंय, ते नुकसान थांबवण्याकरिता आपण त्या राष्ट्राच्या तरुण पिढीला तयार करतोय. त्याकरिता तिथे आपण पार्लमेंट इमारत, धरण बांधलं आहे. रस्त्यांची सुधारणा केली आहे. इस्पितळ, शाळा चालवल्या जातात. महिलांना, मुलींना परिचारिका प्रशिक्षणही दिलं जात आहे. त्याव्यतिरिक्त आपण मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांना इथे प्रशिक्षण देतोय.

ज्या राष्ट्रांमध्ये महिला सशक्त होतात त्या राष्ट्रांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था उत्तम असते. आज जगात सर्वात जास्त पदवीधर स्त्र्ाया हिंदुस्थानात आहेत. अमेरिका, चीन, फ्रान्स यापेक्षाही हिंदुस्थानात जास्त सुशिक्षित महिला आहेत. म्हणून हळूहळू त्यांचा राजकारण, समाजकारण, प्रसारमाध्यमात समावेश वाढत आहे. अफगाणिस्तानला ज्याला आतंकवादी राष्ट्र म्हटले आहे…त्याला आतंकवादातून बाहेर काढून आपण एक सभ्य, सुशिक्षित राष्ट्र निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत. याकरिता यावर गेल्या चार-पाच वर्षांपासून काम करतोय. तरुण पिढीला विशेषकरून मुलींना आपल्या वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण देणार आहोत. केंद्र शासनाच्या सहमतीने ही कामं आपण करत आहोत.

शिक्षणाचं आदान-प्रदान
अफगाणिस्तान हे आपल्या जवळचं राष्ट्र आहे. कोणत्याही राष्ट्रामध्ये शांतीव्यवस्था प्रस्थापित झाली तर त्याचे परिणाम आपल्या देशातही जाणवतात. आपले व्यापारी तिकडे जातील, आपले प्राध्यापक तिथे शिकवायला जाऊ शकतात. हिंदुस्थानातल्या शिक्षिका गणित, इंग्रजी शिकवायला तिथे जाऊ शकतात. यावरून राष्ट्रा-राष्ट्रांमधले संबंध वाढतात. आपण आपल्या विद्वत्तेची निर्यात करतोय, हिंदुस्थानकडे जग खूप अपेक्षेने पाहतंय की, आपला देश त्यांना एका नव्या मार्गाकडे घेऊन जाईल. अफगाणिस्तानातल्या मुली पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत. पाकिस्तानला समर्थन आणि सुरक्षा देणारं चीन हे दुसरं राष्ट्र आहे. चीनही प्रशिक्षण देत नाही, कारण तेथेही मुस्लिम संप्रदाय आहे. त्यांना आतंकवादी मानले जाते. शिवाय अमेरिकेत या मुली गेल्या तर त्यांना इंग्रजी येत नाही. या मुलींना बुरखा घालायची सवय असते. याला ‘सोसायटीकल चेंजेस’ म्हणतात. म्हणजेच सामाजिक सभ्यता याचा त्यांच्याशी मिलाफ होत नाही. रशिया, चीन, पाकिस्तान, अमेरिका हे कोणतेच देश त्यांना शिक्षण देऊ शकत नाही याकरिता आपण हिंदुस्थानी त्यांची मदत करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे हिंदुस्थानकडे अफगाणिस्तानातील लोक खूप आदराने पाहतात. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नफा-तोटा पाहिला जात नाही. तेथे दूरगामी चांगले परिणाम निघतात.

प्रशिक्षण कसं दिलं जातं?
हिंदुस्थानातील इतर सैनिक प्रशिक्षण केंद्रे आहेत तिथेही प्रशिक्षण देत आहोत. राष्ट्रीय सुरक्षा अकादमीअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱया ज्या महिला आहेत त्यांना तामीळनाडूमधील चेन्नई येथे अधिकारी प्रशिक्षण अकादमी आहे. येथे आपण आपल्या हिंदुस्थानातील मुलींनाही अधिकारी पदाकरिता प्रशिक्षण देतो. त्याबरोबरच आपण अफगाणिस्तानातील मुलींनाही प्रशिक्षण देत आहोत. आपले लोकही त्यांची भाषा शिकत आहेत आणि त्यांना इंग्रजी शिकवत आहेत. म्हणजे सैन्य प्रशिक्षणाबरोबर त्यांना भाषेचेही प्रशिक्षण आपण देत आहोत. त्याचप्रमाणे आतंकवादाविरुद्ध युद्ध कसं करायचं, माहिती कशी काढायची, शत्रूची गोपनीय बातमी कशी शोधून काढायची, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आपण त्यांना देत आहोत. याशिवाय तिथल्या गुप्तचर व्यवस्थेलाही आपण मदत करत आहोत. अफगाणिस्तानात सर्वात जास्त (नार्कोटिक) अफू तयार होते. त्याचा व्यापार पाकिस्तानमार्गे जगात होतो. हे कोण विकत घेतं, तयार करतं मादक पदार्थांची तस्करी करणाऱयांना शोधून काढण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं, कारण हाच पैसा आंतकवादी वापरतात. याशिवाय अफगाणिस्तानातल्या मुलींना रेडियो स्टेशन चालवणे, आयटी चालवा, टेलिव्हिजन सेट चालवा, वर्तमानपत्रात लिहा. हे प्रशिक्षणही त्यांना हिंदुस्थानकडून देण्यात येणार आहे.

अफगाणी महिलांचं जीवन
आजही तिथल्या मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, महाविद्यालयात शिकण्याची मनाई आहे, घराबाहेर त्या पडू शकत नाहीत, परपुरुषाशी बोलू शकत नाहीत. त्यांना कायम बुरख्यात राहावे लागते. कोणत्याही राष्ट्रांत जोपर्यंत आपण मुलींना प्रशिक्षण देणार नाही ते राष्ट्र आतंकवादाकडे जातं. याकरिता हिंदुस्थानकडून तिथल्या महिला आणि तरुणींना प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षण देणारे अधिकारी महिला अधिकारीही आहेत. या प्रशिक्षणामुळे तेथील महिलांची मानसिकता नक्कीच सुधारेल यात शंका नाही.