अनुजा साळवी यांच्या याचिकेची हायकोर्टाने घेतली गंभीर दखल, अटकपूर्व जामिनासाठी आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधे सरकारच्या दबावतंत्राला आव्हान देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांनी दाखल केलेल्या याचिकेची सोमवारी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. तसेच अतिरिक्त प्रतिज्ञापत्राद्वारे तपासाशी संबंधित आणखी कागदपत्रे सादर करण्यास अनुजा साळवी यांना मुभा देत त्यांच्या अटकपूर्व जामिनाची मंगळवारी सुनावणी घेण्याचेही निश्चित केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गेल्या महिन्यात राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी छापेमारी केली. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करताना कुटुंबीयांनाही आरोपी बनवून टार्गेट केले आहे. या पार्श्वभूमीवर अनुजा साळवी व त्यांचे पुत्र शुभम साळवी यांनी अॅड. राहुल अरोटे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी एसीबीच्या कारवाईसंबंधी कागदपत्रांच्या अनुषंगाने युक्तिवाद करण्याची तयारी दर्शवली. त्याला एसीबीतर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनीही हरकत नसल्याचे सांगितले. उभय बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती कोतवाल यांनी अनुजा साळवी यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्रासोबत कागदपत्रे सादर करण्यास मुभा दिली. तसेच अटकपूर्व जामिनाची मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याचेही निश्चित केले.

अनुजा साळवी यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात एसीबीने दाखल केलेल्या गुह्यात अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली आहे. तसेच तेथील सत्र न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवताना मिंधे गटाच्या दबावतंत्राची पोलखोल केली आहे.