
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात गुहागरहून मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या आराम बसला अपघात झाला. घाट चढणारी ही बस सुमारे 25 फूट खोल दरीत कोसळली. बसमधून प्रवास करणाऱ्या सगळ्याच प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून या जीवघेण्या अपघातातून सर्व प्रवासी सुखरूप बचावले. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
गुहागर तालुक्यातून ही बस प्रवासी घेऊन मुंबईकडे जायला निघाली होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही बस कशेडी घाट चढत असताना चालकाचा अचानक बसवरील ताबा सुटला आणि ती रस्ता सोडून दरीत कोसळली. अपघात झाला तेव्हा काळाकुट्ट अंधार असल्याने प्रवासी चांगलेच घाबरून गेले. प्रत्येकजण आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करून लागला. यावेळी प्रवाशांनी फोडलेल्या किंकाळ्या रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराला चिरत होत्या.
अपघात झाल्याची खबर कशेडी वाहतूक पोलिसाना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बसमधून अडकून पडलेल्या प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. दरीत अडकलेले प्रवासी रस्त्यावर आल्यावर परमेश्वराचे आभार मानत होते. महामार्गावरील कशेडी घाटात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दोन दिवसांपूर्वी याच घाटात वाळूचा डंपर रिक्षावर पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन विद्यार्थिनी आणि रिक्षाचालकाचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा या घाटात आराम बसला अपघात झाला. या अपघातातून सर्व प्रवासी आश्चर्यकारकरित्या वाचल्याने काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची सगळ्यांनाच प्रचिती आली.





























































