योगी सरकार बरखास्त करा, अर्जुन डांगळे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिह्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणात उत्तर प्रदेशचे पोलीस प्रशासन आणि योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशयास्पद आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कायदा-सुव्यवस्था ढासळलेले आणि महिलांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरलेले उत्तर प्रदेशचे योगी सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अर्जुन डांगळे यांनी केली आहे.

हाथरस प्रकरणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर कार्यकर्ते हे हाथरसमध्ये पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. मात्र त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखले, त्यांना धक्काबुक्की केली. दुर्दैवाची बाब म्हणजे पीडितेच्या नातेवाईकांना दूर ठेवून कुणालाही न कळवता पोलिसांनीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार करण्याची घाई पोलिसांनी का केली? यामुळे पोलिसांना काहीतरी लपवायचे आहे अशी शंका येते. शिवाय लोकांचा उद्रेक रोखण्यासाठी पोलिसांनीच त्या मुलीला जिवंत जाळल्याची शंका येते. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. त्या मुलीला न्याय मिळावा यासाठी देशात सुरू असलेल्या लढय़ाला रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा पाठिंबा आहे, असेही डांगळे यांनी म्हटले आहे.