
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तारखांची येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने शनिवारी निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी तंबी निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष किंवा उमदेवाराने लष्कराचा वापर करू नये, तसेच कोणत्याही सैन्य अधिकाऱ्याच्या किंवा जवानाच्या फोटोचा वापर करू नये असे निर्देश निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील निवडणूक आयोगाने असे निर्देश दिले होते.
2019 लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. याच पार्श्वभूमिवर निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना पत्र पाठवून निवडणुकीमध्ये लष्करी अधिकारी किंवा जवानांचा फोटो वापरू नका असे निर्देश दिले. काही पक्ष आपल्या प्रचारामध्ये असे फोटो वापरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर निवडणूक आयोगाने हे निर्देश दिले आहेत. याआधी 3 डिसेंबर, 2013 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. जर कोणत्याही पक्षाने असे केल्याचे निदर्शनास आल्यास निवडणूक आयोग यावर कडक कारवाई करेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्य़े घुसून एअर स्ट्राईक केला. याचे राजकारण सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत बोलताना निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले की, राजकीय सभांमधून लष्करी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तराचा उल्लेख करण्यावर बंधन नाही. परंतु प्रचारादरम्यान लष्करप्रमुख किंवा सैन्याधिकाऱ्याचा फोटो आपल्या फोटोशेजारी लावण्यात मनाई करण्यात आली आहे.



























































